

पुणे: आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल ‘स्टार एअर’या विमान कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर रविवारी (दि. 29 जून) पहाटे आला. विमानतळ परिसरात आणि विमानांमध्ये स्फोटक वस्तू ठेवल्या आहेत. इमारत तत्काळ रिकामी करा, अन्यथा लोकांचे प्राण जाऊ शकतात, असा मजकूर या मेलमध्ये होता. रोडकिल आणि क्यो या नावांनी ही धमकी दिली आहे.
याप्रकरणी, मेल पाठविणार्या व्यक्तीच्या विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कंपनीच्या वतीने अदनान शेख यांनी फिर्याद दिली आहे. हा ई-मेल पहाटे 1.25 वाजता एका इमेल आयडीवरून पाठवला होता. (Latest Pune News)
कंपनीत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेले आदनान शेख (रा. कोंढवा) हे सकाळी 6.45 वाजता कामावर हजर झाल्यावर त्यांनी ही माहिती वाचली आणि तत्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवले. त्यानंतर सीआयएसएफ, एटीएस, बीडीडीएस आणि विमानतळ प्रशासनाने एकत्रितपणे विमानतळ आणि विमानांची तपासणी केली. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आली नाही. सायबर क्राईम शाखेच्या सहाय्याने पुढील तपास सुरू आहे.