कोंडीभाऊ पाचारणे
Flyover Project In Pune
खेड : पुणे-नाशिक महामार्गाच्या राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावर तुकाईवाडी चौकात उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली.
पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण नुकतेच झाले. चौपदरीकरण झाल्यावर पाच वर्षांच्या काळात अनेकांनी व्यवसाय उभारले आहेत. शेतीसाठी तसेच लगतच्या शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज काढुन हॉटेल, लॉजिंग व्यवसाय सुरू केले असल्याने सद्यस्थितीतील रस्ता कायम रहावा, भुयारी मार्ग तयार करून राजगुरुनगर शहराकडे जाण्यासाठी वळण मार्ग करावा अशी स्थानिक म्हणजेच तुकाईवाडी, सांडभोरवाडी, वरची भांबुरवाडी गावाच्या नागरिकांची मागणी होती. मात्र ही मागणी अमान्य होऊन येथे उड्डाण पुल आणि उंच रस्ता उभारण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना दिलीप मेदगे म्हणाले की, महामार्गावर असलेल्या चासकमान कालवा ते खेड घाटाच्या पायथ्यापर्यंत असे १.८ किलोमीटर अंतर उंच रस्ता तयार करण्यात येणार आहे. तुकाईवाडी येथील मुख्य चौकात साडेपाच मीटर उंच उड्डाण पुल आणि त्यानुसार दोन्ही बाजूचा रस्ता उंचावणार आहे. याशिवाय दोन्ही बाजूला उपरस्ते (सर्व्हिस रोड) करण्यात येणार आहेत. या कामासाठी ४० कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असुन २५ जुन रोजी ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे बंधन आहे.
पुणे नाशिक महामार्गाच्या राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावर तुकाईवाडी हद्दीत भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. मुळात आडबाजूला असल्याने हा मार्ग उपयोगाचा नाही. पाऊस थांबल्यावर देखील या मार्गावर गुडघाभर पाणी-साठून रहात असल्याने येथील खड्डा वाढला आहे. वाहनचालक या मार्गावर जात नाहीत.
उलट बाह्यवळण रस्त्यावर तुकाईवाडी चौकात वेगात असलेल्या वाहतुकीच्या वर्दळीतून धोकादायक पद्धतीने वाहने वळवली जातात. तुकाईवाडी चौकात रस्ता उंच करून दोन्ही बाजूला उप रस्ते खुले करण्यात येणार आहेत. हे काम प्रलंबित आहे. तर पर्यायी भुयारी मार्गावर पाणी साचत आहे. परिणामी वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून चौक पार करावा लागत आहे.