सासवड : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्रिदेव आहेत. तिघांच्या चर्चेतून कोण, कोणती जागा लढवतील हे ठरवले जाईल. आम्ही युतीत आहोत, जिथे ज्यांची ताकद असेल, तर तिथे तो पक्ष जागा लढवेल, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. सासवड (ता पुरंदर) येथील पुरंदरेश्वरा निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका कमीत कमी 45 खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान बनवायची आहे.
राज्यात ओबीसी आणि मराठा संघर्ष हे दुर्दैव आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच जाती-जातींमध्ये वाद निर्माण झाले नव्हते. या सगळ्या गोष्टी बिहारमध्ये चालत होत्या. राज्याला आणि देशाला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळ्यांनी समतोल राखला पाहिजे. मुख्यमंत्री हे कर्तृत्ववान आहेत, ते नक्कीच टिकणारे आरक्षण देतील, असे शिवतारे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आरक्षण टिकले नाही. मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल, तर तो महाविकास आघाडी सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिले गेले पाहिजे, अशी भूमिका शिवतारे यांनी मांडली.
राजकारणातील पातळी खालच्या स्तरावर कोणी आणली असेल, तर ती खा. संजय राऊत यांनी आणली आहे. राऊत यांनी आपली लायकी ओळखावी आणि मगच मुख्यमंत्री यांच्यावर टीका करावी. सर्वसामान्य माणूस जर आपल्या कर्तृत्ववाने मुख्यमंत्री बनला असेल, तर त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे होय. संजय राऊत राजकीयदृष्ट्या वेडे आहेत, अशी टीका माजी शिवतारे यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मराठा आरक्षणाबाबत काहीही बंडल मारत आहेत. सन 2014 मध्ये आरक्षण का गेले हे चव्हाण यांना माहीत आहे का ? मागास आयोगाने मराठा समाज मागास आहे, त्याबद्दल अहवाल दिला पाहिजे. त्याकाळात ती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही. राजकारणाच्या दृष्टीने त्यांनी तो निर्णय घेतला होता. ती लोकांची फसवणूक केली आहे, असे शिवतारे म्हणाले.
पुरंदर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा शनिवारी (दि. 9) मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास शिवसेना नेते माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे व शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या ज्योती वाघमारे हे मार्गदर्शन करणार असल्याचे या वेळी शिवतारे यांनी सांगितले.
हेही वाचा