Pimpri News : आता नवा डाव, नवे चेहरे : जयंत पाटील | पुढारी

Pimpri News : आता नवा डाव, नवे चेहरे : जयंत पाटील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही महाविकास आघाडी सर्वांना पसंत आहे. मात्र, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. हे बुद्धिचातुर्य, कपटीपणा कोणाचा हे जनतेला माहिती आहे. सर्वजण गेलेल्यांची चिंता करत आहेत; मात्र सध्या जे कार्यकर्ते सोबत आहेत, त्यांची चिंता करा. गेलेले येत नसतात. ते संपून जातात. त्यांचा रोज जप करणे बंद करा. आता नवा डाव सुरू करा. चांगले कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे आणा, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. 2) व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले; तसेच याप्रसंगी पक्षाच्या शहर कार्यकारिणीचा नियुक्ती सोहळा व कार्यकर्ता मेळावा झाला. त्या प्रसंगी पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत-धर, पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शहर निरीक्षक प्रकाश म्हस्के, कामगार नेते काशिनाथ नखाते, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यांनी गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादीची नौका कधीही बुडू दिली नाही. वॉर्ड, बुथची बांधणी करा. काहीजण पक्षामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यांना घेऊन पक्ष वाढवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील शहरात सभा घेण्याचे नियोजन आहे.

..तर राजकीय संन्यास घेईन

भाजपच्या विचारधारेशी जुळले नाही, त्यामुळे आपण राष्ट्रवादीसोबत आलो. यापुढे राजकीय संन्यास घेऊ, पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, असे तुषार कामठे यांनी स्पष्ट केले.

घड्याळही तेच, मालकही तेच..

घड्याळही तेच, वेळही तीच आणि मालकही तेच, फक्त साहेब. असे ब्रीदवाक्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी लावले होते. त्याचा उल्लेख डॉ. सुलक्षणा शीलवंत-धर यांनी त्यांच्या भाषणात केला. मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

हेही वाचा

Back to top button