राजगुरुनगर: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल पडल्याची दुर्घटना घडून चौघांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतरदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही. खेड तालुक्यातील शिरोली-पाईट रस्त्यावर ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे लादवड येथे गेले सहा महिन्यांपासून पुलाचे काम अंत्यत संथगतीने सुरू आहे.
काम अर्धवट असल्याने ओढ्यामध्ये भराव टाकून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे ओढ्यातून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून लोकांना प्रवास करावा लागतो. (Latest Pune News)
खेड तालुक्यातील रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारांच्या मनमानीचा त्रास जनतेलाच सहन करावा लागत आहे. ठेकेदारांना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने प्रशासनाने कितीही नोटिसा दिल्या तरी त्यांना फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
शिरोली-पाईट रस्त्यावर अनेक ठिकाणी पूल, साकवची कामे सुरू आहेत. बहुतेक कामे अर्धवट आहेत. पावसाने चांगली उघडीप देऊनदेखील संबंधित ठेकेदारांनी कामे पूर्ण केली नाहीत. मुसळधार पावसामुळे व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसला.
चांडोली फाटा ते कडूस हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. मे महिन्यातच या रस्त्याचे काम सुरू केले. परंतु, हे काम सुरू करताना संबंधित ठेकेदाराने दौंदे ते कडूसपर्यंतचा तब्बल 15-20 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदून ठेवला, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे ठरत आहे.
लादवड येथील पुलाचे काम अर्धवट असल्याने ठेकेदाराने ओढ्यात भर टाकून तात्पुरती सोय केली. परंतु, गेले चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा भराव टाकलेला रस्ता पाण्याखाली गेला. जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करीत आहेत.- नितीन भोकसे, सरपंच कुरकुडी, गणेश काळे आदर्श सरपंच
खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा या कामांवर परिणाम झाला आहे. दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन पावसाने उघडीप दिल्यानंतर तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.- बाबाजी काळे, आमदार खेड- आळंदी