पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 27 अधिकार्यांचा इतरत्र बदल्या झाल्या आहेत. मात्र, ठराविक अधिकार्यांना सामावून घेण्यासाठी आमच्यावर अन्याय केला, अशी नाराजी व्यक्त करत काही अधिकार्यांनी मॅटमध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) धाव घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 1) तीन जणांच्या बदली आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नियमानुसार पोलिस अधिकार्यांचा बदल्या करण्याचे आदेश दिले. यामध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 27 पोलिस अधिकारी बाहेर गेले आहेत. तर, 24 जण बाहेरून शहरात आले आहेत. यातील 19 जण नागपूर येथे कार्यरत होते. दरम्यान, शहरातील प्रभारी अधिकार्यांची अकार्यआरी पदावर म्हणजेच गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या जागेवर नागपूरहून बदलून आलेल्या निरीक्षकांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
एकीकडे पोलिस ठाण्यांचे प्रभारी ठरत असताना दुसरीकडे बदलून गेलेल्या अधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. आमच्यावर अन्याय केल्याची खंत काही अधिकार्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. तसेच, मॅटमध्ये धाव घेत बदली आदेशाला स्थगिती मिळवली. यावर 9 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मॅटने स्थगिती दिल्याने नागपूरच्या बदलीमुळे निराश झालेल्या अधिकार्यांना आशेचा एक नवा किरण सापडला आहे. या स्थगिती आदेशाच्या आधारावर आणखी काही निरीक्षक मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत असून शहरात बदल्यांचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या तीन निरीक्षकांनी आपली प्रकरणे दाखल केली आहेत. त्यांच्या बदली आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
– अॅड. पूनम महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ
हेही वाचा