Traffic Problem Online Pudhri
पुणे

Traffic Problem | शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आता अवजड वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ, या वेळेत ही बंदी असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

साधारण पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतून हा महामार्ग जातो आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येत वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या पाहता शहरातून जाणारा मुंबई-बेंगळुरू महामार्ग हा सद्यःस्थितीत शहरी वाहतुकीचा अविभाज्य भाग बनला आहे. या रस्त्याभोवती वाढलेले नागरीकरण आणि हिंजवडी आयटी पार्कमुळे या रस्त्यावरून स्थानिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.

परिणामी, सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी गर्दीच्या वेळेला अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी वरिष्ठ निरीक्षक राजकुमार शेरे आणि सुनील गवळी उपस्थित होते. हिंजवडी आयटी पार्कमुळे सकाळी विविध कंपन्यांच्या कार्यालयांना जाण्याची आणि सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावर कोंडी होते, असे दिसून आले आहे.

वाहतूक कोंडीला कंटाळून काही आयटी कंपन्यांनी पुण्यातून काढता पाय घेतला आहे. तसेच मागील काही वर्षांपासून रिंगरोडचा देखील विषय प्रलंबित आहे. या रस्त्यावरील वडगाव पूल आणि वारजे येथील मुठा नदीवरील पुलाच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. या दोन्ही पुलांची रुंदी तुलनेने कमी आहे.

बाकीचा रस्ता रुंद आणि पूल केवळ दोन मार्गिकांचा असल्याने येथे बॉटल नेक झाला आहे. या परिस्थितीत अवजड वाहने गर्दीच्या वेळेत रस्त्यावर आली नाहीत, तर दिलासा मिळेल, दोन वर्षात ३६ मृत्यू या रस्त्यावर गेल्या वर्षी २१ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर या वर्षी आत्तापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहनांवरील निर्बंधांचा निर्णय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी एकत्रित घेतला आहे. जिल्हाधिकारी या प्रस्तावावर हरकती व सूचना मागवून अंतिम निर्णय घेतील.

अवजड वाहने थांबविण्यासाठी जागा निश्चित कात्रज-देहूरोड बायपासवर अवजड वाहनांना बंदी केल्यावर ती वाहने महामार्गावर थांबविण्यासाठी पोलिसांनी जागा शोधल्या आहेत. सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात १७ एकर जागा उपलब्ध असून, पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे आणि पुणे-मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

शहरातून जाणाऱ्या काही महामार्गावर सकाळी आणि सायंकाळी विशिष्ट वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार आहोत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांतून जाणाऱ्या महामार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत.
मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT