मँचेस्टर, वृत्तसंस्था : Joe Root Test Fifty Record : मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयानंतर इंग्लिश संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या सामन्यात जो रूटने दुसऱ्या डावात 62 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने ॲलन बॉर्डर, राहुल द्रविड आणि रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे.
जो रूटने मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात 128 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 64 वे अर्धशतक ठरले. आता तो कसोटीत सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्या नावावर 144 कसोटी सामन्यांच्या 263 डावांमध्ये 64 अर्धशतकांची नोंद झाली आहे.
या सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने कसोटीत सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत ॲलन बॉर्डर, राहुल द्रविड आणि रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. ॲलन बॉर्डर आणि राहुल द्रविड यांची कसोटीत 63-63 अर्धशतके आहेत, तर रिकी पाँटिंगच्या नावावर कसोटीत 62 अर्धशतके आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर 68 अर्धशतके आहेत. दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल आहे, ज्याने 66 अर्धशतले झळकावली आहेत.
68 : सचिन तेंडुलकर
66 : एस चंद्रपॉल
64 : जो रूट
63 : ॲलन बॉर्डर
63 : राहुल द्रविड
62 : रिकी पाँटिंग
याशिवाय मँचेस्टरच्या मैदानावर 8 वे अर्धशतके झळकावून रूटने या मैदानावर त्याने सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत इयान बेल आणि डेनिस कॉम्प्टन यांनाही मागे टाकले आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नावावर मँचेस्टरच्या मैदानावर प्रत्येकी सात अर्धशतके आहेत.
इंग्लंडसाठी चौथ्या डावात सर्वाधिक वेळा पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट चौथ्या क्रमांकावर आहे. कसोटी कारकिर्दीत त्याने 10व्यांदा दुसऱ्या डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या स्थानी माईक आथर्टन आणि ॲलिस्टर कुक हे संयुक्तपणे आहेत. त्यांनी अशी कामगिरी 11 वेळा केली आहे. आता रुटने दुसऱ्या स्थानावरील जेफ्री बॉयकॉट यांची बरोबरी केली आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या डावात 236 धावा केल्या. श्रीलंकेकडून पहिल्या डावात धनंजय डी सिल्वा आणि मिलन रथनायके यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात जेमी स्मिथच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा केल्या. जेमी स्मिथने 111 धावांची खेळी केली.
श्रीलंकेने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. कमिंडू मेंडिसचे शतक आणि चंडीमल आणि अँजेलो मॅथ्यूजच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 326 धावा केल्या. इंग्लंडला 200 हून अधिक धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठले.