पुणे : बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रसिद्ध आणि नेहमीच वाहनांची वर्दळ असलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रस्ता) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीवर आधारित कॅमेर्यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या योजनेचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी आदी या वेळी उपस्थित होते.
वाहनचालकांनी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास, त्यांचे वाहन आणि क्रमांक एआय कॅमेर्यांद्वारे टिपले जाणार असून, एक मिनिटात वाहन न हलवल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. तसेच, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, दुहेरी पार्किंग आणि रस्त्यावर अधिक वेळ वाहन उभे करणे आदी गोष्टींवरही एआयद्वारे कारवाई केली जाणार आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते, याचे मुख्य कारण म्हणजे अस्ताव्यस्तपणे होणारे वाहनाचे पार्किंग. रस्त्याच्या कडेने एकाहून अधिक रांगा लावून वाहने पार्क केल्याने रस्त्यावरून जाणार्या वाहनांना त्याचा अडथळा ठरतो. महापालिका आयुक्तांसह विधी विभागाने अनेक वेळा वाहनचालक किंवा त्यांच्या चालकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. आता एआय प्रणालीमुळे चालकाचे वाहन, क्रमांक व नियमभंग याचे छायाचित्र लगेच टिपले जाईल. वाहनचालकाला सूचना देऊनही त्याने वाहन हलवले नाही, तर ऑनलाइन दंड बजावला जाणार आहे.
काही वाहनचालक आपले वाहन रस्त्यावर उभे करून कार्यालये किंवा खाद्यपदार्थ विकणार्या ठिकाणी जातात. काही प्रकरणात चालक वाहनातच बसून राहतात व पोलिसांनी हटवण्यास सांगितल्यास वाद घालतात. या नव्या यंत्रणेमुळे अशा घटनांमध्ये घट होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
काही वाहनचालक आपले वाहन रस्त्यावर उभे करून कार्यालये किंवा खाद्यपदार्थ विकणार्या ठिकाणी जातात. काही प्रकरणात चालक वाहनातच बसून राहतात व पोलिसांनी हटवण्यास सांगितल्यास वाद घालतात. या नव्या यंत्रणेमुळे अशा घटनांमध्ये घट होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
एआयद्वारे वाहतूक बेशिस्तीवर कारवाई करण्याची योजना ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील इतर गर्दीच्या भागातही भविष्यात ही यंत्रणा राबवण्याचा विचार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून, सार्वजनिक रस्त्यांचा सुसज्ज वापर करावा. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे रस्ते आदर्श रस्ता करण्याचा आमचा प्रयत्न आहे.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
विमानतळाबाहेरील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे रस्त्यावर केल्या जाणार्या बेशिस्त पार्किंगला चाप लावणे गरजेचे आहे. यासाठी या रस्त्यावरही लवकरच एआय आधारित कारवाईची यंत्रणा उभी केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी विमानतळ प्रशासनाला त्याबाबत विनंती केली असून, त्यांच्याकडून ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामध्ये ओव्हरहेड गँट्रीच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांना सूचित करून कारवाई केली जाणार आहे.
पाहा नेमकी काय आहे योजना...
एफ.सी. रोडवरील गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल स्क्रीन बसवले जातील.
हे कॅमेरे बेकायदा व चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणार्या वाहनांची ओळख करून त्यांचा क्रमांक स्क्रीनवर दाखवतील.
वाहनचालकाला वाहन हटवण्यासाठी फक्त एक मिनिटाचा अवधी दिला जाईल. जर वाहन हलवले न गेल्यास थेट ऑनलाइन चलन टाकले जाईल
पोलिसांनी रस्त्याच्या संपूर्ण पट्ट्याचा अभ्यास करून 6 ठिकाणी अनधिकृत पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत.
या प्रणालीचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि पोलिसांशी होणारे वाद टाळणे हा आहे.