

पुणे: सोलापूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून (वेणूनगर,ता.पंढरपूर) कामगारांच्या थकीत देणी आणि व्यापार्यांच्याही रकमा थकीत राहिल्याने संबंधितांनी साखर आयुक्तालयासमोर मंगळवारपासून (दि.27) बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या प्रश्नी आयुक्तालयातील अधिकार्यांबरोबर बुधवारी झालेली चर्चा फिस्कटल्याने कामगार आंदोलनावर ठाम राहिले आहेत. (Pune News Update)
केंद्राच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी)राज्य सरकारच्या हमीवर विठ्ठल कारखान्यास कर्ज दिले. या कर्ज रक्कमपैकी व्यापार्यांची देणी 59.75 कोटी आणि कामगारांची थकीत देणी 41.87 कोटी दिलेली नसल्याची माहिती व्यापारी संतोष भालेराव, वयोवृध्द साखर कामगार रामचंद्र जगन्नाथ भुसनर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
“साखर कारखान्याचा हंगाम सुरु करण्यास आम्ही प्राधान्य दिले. शिवाय कामगारांच्या थकीत देण्यापैकी 25 टक्के रक्कम दिली आहे. आत्ताही उर्वरित 25 टक्के रक्कम देत असून प्रथमपासूनच आम्ही त्यांच्यांशी चर्चा करीत आलो आहोत. साखर आयुक्तालयात येऊनही मी अधिकार्यांसमोर संयुक्त चर्चेत रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. बरेचसे कामगार टप्प्याटप्याने रक्कम घेत आहेत. काही थोडेच कामगार न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना आंदोलनाची भुमिका घेत आहेत.
आमदार अभिजित पाटील, अध्यक्ष, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूर
या बाबत बुधवारी साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव आणि सोलापूर प्रादेशिक साखर सह संचालक प्रकाश अष्टेकर यांच्यासमवेत कामगारांच्या शिष्टमंडळबरोबर बुधवारी सायंकाळी उशिरपर्यंत चर्चा झाली. त्यावर साखर आयुक्तालयाने शासनाचे विशेष लेखापरिक्षक जी.व्ही. निकाळजे (साखर) यांना चौकशी करण्याकामी नियुक्ती केली असून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले आहे. शिवाय एनसीडीसी कर्जाबाबतची माहितीही आल्यानंतर शासनास अहवाल दिला जाईल, असे चर्चेत स्पष्ट केले. त्यावर कामगार व व्यापार्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय बैठकीअंती रात्री उशिरा घेतला आहे.