

पुणे : विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात घडली. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 17 वर्षीय मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News Update)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा महाविद्यालयात अकरावी शिकत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील फुरसुंगी भागात अल्पवयीन युवती राहायला आहे. युवतीच्या घराशेजारी आरोपी युवक राहायला आहे. युवकाने तिच्याशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला विवाहाचे आमिष दाखविले. दरम्यान, युवती वेगळ्या जातीतील असल्याने अल्पवयीन तरुणाने विवाहाला कुटुंबीय मान्यता देणार नाहीत, असे तिला सांगितले. तेव्हापासून मुलगी नैराश्यात होती. 23 मे रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीची मुलाने फसवणूक केली तसेच त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले तपास करीत आहेत.
विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवानी हेमंत सिंग (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अमित परमार (वय 26, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवानीचा भाऊ चंद्रशेखर सिंग (वय 32, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) याने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.