पुणे

पुणे : राजगुरुनगर परिसरात रोजच होतेय वाहतूक कोंडी

अमृता चौगुले

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा

गंध, साखरपुडा, लग्नमुहूर्तांमुळे वाढलेल्या गर्दीमुळे राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर दैनंदिन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यावर एकमेव उपाय असलेले बाह्यवळण महामार्गाचे काम मात्र संथगतीने सुरू आहे. रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवाशांचे हाल होतात. स्थानिक नागरिक तर या समस्येने पुरते हैराण झाले आहेत. रोज भर उन्हात पोलिस रस्त्यावर उतरतात म्हणून निदान कासवगतीने का होईना वाहतूक सुरू राहते. बाह्यवळण कामाची सुरुवात झाल्यापासून शहरातील महामार्गावरची वाहतूक कोंडी कमी होण्याचा दावा करून फ्लेक्सद्वारे श्रेय लाटण्याची स्पर्धा करणारे लोकप्रतिनिधी मात्र या कोंडीवर बोलताना दिसत नाहीत.

बाह्यवळण रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे.

लग्नसराईमुळे गर्दी वाढली

सध्या लग्न हंगाम जोरात सुरू आहे. कोरोनाकाळात मर्यादित होणारे समारंभ पुन्हा मंगल कार्यालयात तेही धूमधडाक्यात होऊ लागले आहेत. दिखाव्याबरोबरच मोठी उपस्थिती हा 'ट्रेंड' बनला आहे. उपस्थितांसाठी सोईस्कर म्हणून राजगुरुनगर, चाकण शहरात महामार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयांना प्राधान्य आहे. ही कार्यालये सध्या वऱ्हाडींनी फुलून गेली आहेत. त्यांच्या वाहनांनी पार्किंग ओव्हरफुल्ल झाली आहेत. जेव्हा ही वाहने मुहूर्त गाठण्यासाठी धावपळ करतात तेव्हा रस्ते ठप्प होतात. असे प्रसंग राजगुरुनगर, चाकण शहरात रोज सकाळी, संध्याकाळी अनुभवायला मिळत आहेत.

शुक्रवारी (दि. १३) मोठी लग्नतिथी असल्याने राजगुरुनगर शहरात अकरा वाजता वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. शहरात कोंडी झाल्यावर त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यावर झाला, तर शहरापासून चांडोली टोलनाक्यापर्यंत जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहने उभी राहिली. टोल आकारला जात नसतानाही शुक्रवारी पुण्याच्या दिशेने आलेली वाहने येथे रांगेत उभी होती. दुसऱ्या बाजूने थिगळे स्थळपर्यंत रांग लागली. गंध, साखरपुडा सुरू होण्यापूर्वी एक ते दीड तास आणि हे वऱ्हाडी परत जाईपर्यंत अशी ही वाहतूक सुरळीत व्हायला दोन ते तीन तास गेले. तोपर्यंत पुन्हा लग्नमुहूर्ताची वेळ गाठण्यासाठी वाहने रस्त्यावर आली आणि पोलिसांना जराही उसंत मिळाली नाही, असा दिनक्रम झाला आहे.

बाह्यवळण काम संथगतीने

अंतिम टप्प्यात आलेले बाह्यवळणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. भीमा नदीवरील पूल आणि काही प्रमाणात भरावा व रस्ता असे काम बाकी आहे. खास बाब म्हणून यातील एकेरी मार्ग सुरू झाला, तरी शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. मात्र, ठेकेदार कंपनीला कोणीही धारेवर धरत नाही. ठेकेदार कंपनी आणि बोलघेवड्या नेत्यांचे साटेलोटे असावे का? असे त्रासलेल्या स्थानिक नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.

SCROLL FOR NEXT