पुणे

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; उपाययोजना करण्याची मागणी

Laxman Dhenge

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी व दुचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. यामुळे परिसरात सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनचालकांससह रहिवाशांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेच्या वतीने गंगाधम सोसायटीमध्ये हॉटेल मेघदूत ते गंगाधाम फेज -2 खंडेश्वर सोसायटीपर्यंत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता, पदपथ, सायकल ट्रॅक बांधला आहे. परंतु, मेघदूत हॉटेल ते गंगाधाम सोसायटीमधील फेज दोनच्या प्रवेशद्वारापर्यंत दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांचे अनधिकृतपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या भागात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात
होत आहे. 'गगन गॅलेक्सी'मधील काही गाळेधारकांनी दुकानासमोर सोसायटीच्या पार्किंगच्या जागेवर पोटभाडेकरू ठेवल्यामुळे रस्त्यावर वाहने पार्किंग केली जातात. तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी व्यवसाय चालू राहतात.

वाढदिवसाच्या पार्ट्या, अनधिकृत खाऊ गल्ली आदींमुळे स्थानिक नागरिकांना दिवसेंदिवस त्रास सहन करावा लागत आहे. यावर वाहतूक पोलिस व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा वचक नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गगन गॅलेक्सी सहकारी गृहरचना संस्थेतील एका रहिवाशाने सांगितले की, आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून या सोसायटीत सदनिका घेतल्या आहेत. मात्र, सकाळी व सायंकाळच्या वेळी या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आहे, याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आम्हाला काही लोकांकडून दमदाटी केली जात आहे.

गंगाधाम सोसायटीमधील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते, हे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांकडून याबाबत तक्रारी आल्या आहेत. या ठिकाणी नागरिकांनी वाहनांचे पार्किंग करू नये; अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

-स्वप्निल नेवसे, सहायक पोलिस निरीक्षक, स्वारगेट वाहतूक विभाग

गंगाधम सोसायटीमधील मेघदूत हॉटेल परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने लवकरच 'नो पार्किंग'चे बोर्ड लावले जातील.

-प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT