Dangerous bridge Pudhari
पुणे

Dangerous bridge: मर्यादा केवळ 20 जणांची; गर्दी शंभरांची! झुलत्या पुलावर मृत्यूचे सावट ?

पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे आणि वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे अपघाताचा धोका गंभीर झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

साहेबराव लोखंडे

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावाजवळील कुंड पर्यटनस्थळी कुकडी नदीवर असलेला झुलता पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे आणि वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे अपघाताचा धोका गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची जबाबदारी स्वीकारावी, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे.

अलीकडेच मुळशी तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या पुलाच्या दुर्घटनेत निष्पापांना जीव गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर टाकळी हाजी येथील झुलता पूल देखील धोकादायक स्थितीत असून, तत्काळ उपाययोजना न झाल्यास येथे देखील अशाच स्वरूपाची दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2011 मध्ये हा पूल बांधून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला असला, तरी सध्याच्या आर्थिक मर्यादांमुळे ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ’पुलाची देखभाल व डागडुजी ही आमच्याकडे का?’ असा सवाल ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रांजणखळगे पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी वर्दळ होत आहे. झुलत्या पुलावरून निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. परंतु, पुलाची क्षमता केवळ 20 व्यक्तींची असून, त्यापेक्षा अधिक गर्दी होत असल्याने दुर्घटनेचा धोका वाढला आहे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

दुरुस्तीसह नवीन आरसीसी पुलाची मागणी

ग्रामसभेच्या ठरावानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, नव्या आरसीसी पुलासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सध्याचा फक्त 5 फूट रुंद पूल, नवरात्र, यात्रा व उत्सवकाळात होणार्‍या गर्दीसाठी अत्यंत अपुरा आणि असुरक्षित आहे, असे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस बंदोबस्त आणि सूचनाफलकांची मागणी

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीने शिरूर पोलिस ठाण्याकडे बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्याची विनंती केली आहे. तसेच, पुलावर सूचनाफलक, प्रवेश मर्यादा आणि नियमित तपासणी यांची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

तातडीने कृती झालीच पाहिजे : ग्रामस्थांचा इशारा

टाकळी हाजी ग्रामस्थांनी पर्यटन विकास निधीतून आरसीसी पूल, संरक्षक भिंती आणि संपूर्ण कुंड परिसरात सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT