पुणे

सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी; मोठी दुर्घटना टळली

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाजा परिसरात हुल्लडबाजी करीत पर्यटकांनी आग्या मोहोळाच्या पोळावर दगडफेक केली. त्यामुळे मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यात 9 पर्यटक जखमी झाले. पर्यटकांच्या मागे मधमाश्या धावत असताना प्रसंगसावधनता दाखत गडावरील सुरक्षारक्षकांनी धूर करून मधमाश्यांना पिटाळून लावले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.

कल्याण दरवाजा प्रवेशद्वाराच्या तटबंदीशेजारील कड्याच्या कपारीत पाच-सहा आग्या मोहोळाची पोळे आहेत. रविवारी सकाळी शंभर-दीडशे पर्यटकांनी कल्याण दरवाजा प्रवेशद्वाराच्या परिसरात गर्दी केली होती. बांबूच्या बेटाजवळ कपारीत बसलेल्या मोहोळावर काही पर्यटकांनी दगड मारल्याने मोहोळ उठले. प्रथम तीन ते चार जणांना मधमाश्यांनी दंश केला. त्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या इतर पाच-सहा जणांचा मधमाश्यांनी जोरदार चावा घेतला. त्यामुळे 'वाचवा, वाचवा' असा आरडाओरडा करीत पर्यटक सैरावैरा देवटाक्याकडे धावत सुटले. पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून पुरातत्व तसेच वन विभागाचे सुरक्षारक्षक सुमीत रांजणे, नंदू जोरकर, दत्तात्रय जोरकर, राहुल जोरकर, स्वप्निल सांबरे , राकेश पन्हाळकर, अमोल पढेर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पर्यटकांना तेथून माथ्यावर आणले.

नंतर कल्याण दरवाजा मार्ग बंद करून मधमाश्यांना पिटाळून लावण्यासाठी गवत व ओल्या फांद्या पेटवून धूर केला. त्यानंतर दोन-तीन तासांनी मधमाश्या शांत झाल्या. या परिसरात आग्या मोहोळाचे पोळे असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी हवेलीचे माजी पंचायत सदस्य दत्तात्रय जोरकर यांनी केली आहे. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बाळासाहेब वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे आदींनी कल्याण दरवाजात धाव घेतली. सुरक्षेसाठी कल्याण दरवाजा व परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT