टोमॅटो पिकाला बसतोय उन्हाचा फटका; शेतकरी हैराण  Pudhari
पुणे

Baramati: टोमॅटो पिकाला बसतोय उन्हाचा फटका; शेतकरी हैराण

बारामती तालुक्यात टोमॅटोची शेकडो एकरावर लागवड

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक शेतकर्‍यांनी उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. टोमॅटो पीक शेतात बहरले असतानाच प्रचंड उन्हाने पिकाला धोका निर्माण झाला आहे.

टोमॅटो पीक पिवळे पडणे, करपणे, त्याशिवाय प्लास्टिक व्हायरस या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे पीक जगवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू असतानाच टोमॅटोला अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. बागायती पट्टा असूनही बारामती तालुका गेल्या महिन्याभरापासून अक्षरशः होरपळून निघाला आहे. 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जात आहे.

बारामतीच्या पश्चिम भागात शेकडो एकरांवर टोमॅटोची लागवड झाली आहे. सध्या टोमॅटोची बांधणी सुरू झाली आहे. मात्र, टोमॅटोला प्रतिक्रेट 150 ते 200 रुपये दर मिळत आहे. होळ, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी, सोरटेवाडी, निंबूत, वडगाव, वाकी, चोपडज, वाणेवाडी येथील शेतकर्‍यांनी विविध जातीतील टोमॅटोची लागवड केली आहे. बहारदार पीक येऊनही टोमॅटोला सध्या 10 ते 15 रुपये किलो दर मिळत आहे. नव्यानेच तोडणी सुरू झालेल्या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

गेल्या वर्षी टोमॅटोला केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. अनेकदा उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतातील पिकांत जनावरेही सोडण्यात आली होती. चालू वर्षी बारामती तालुक्यात समाधानकारक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतात विविध प्रयोग राबवत आहेत.मात्र शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. टोमॅटो, कारली, दोडका, काकडी या वेलवर्गीय पिकांना उन्हाच्या तीव्र तेचा फटका बसत आहे.

पुणे, सोलापूर, मुंबई, कर्नाटक आदी शहरांत टोमॅटोची विक्री केली जाते. शेतीमालाचे दर घसरल्याने अगोदरच अडचणीत असलेल्या बळीराजाला तरकारी पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेती मशागत, सरी काढणे, रोपे, ड्रीप, काठी, सुतळी बांधणे, औषध फवारणी, खते, मजूर यासाठी एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. मनी प्लांट म्हणून ओळख असलेले टोमॅटोतून चांगले उत्पन्न मिळाले तरच दोन वर्षांचा झालेला खर्च निघेल असे शेतकर्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT