पुणे

पुणे : नव्या प्रभागरचनेत बोपोडीत अच्छे दिन कोणाला येणार?

अमृता चौगुले

पांडुरंग सांडभोर

पुणे : बहुतांश झोपडपट्टी असलेल्या बोपोडी भागाने आतापर्यंत सर्वच पक्षांना नगरसेवकपदाची संधी दिली. आता नवीन प्रभागरचनेत बोपोडी-पुणे विद्यापीठ हा प्रभाग क्र. 11 थेट सेनापती बापट रस्त्यावरून मॉडेल कॉलनीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ही नवीन रचना पुन्हा भाजपला संधी देणार की महाविकास आघाडीला अच्छे दिन आणणार, याबाबत उत्सुकता आहे.

Ward 11

जुन्या ७ आणि ८ प्रभागांचा भाग

विद्यमान प्रभाग क्र. 8 औंध-बोपोडी आणि प्रभाग क्र. 7 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या दोन प्रभागांचा एकत्रित परिसर येऊन प्रभाग क्र. 11 नव्याने अस्तित्वात आला आहे. यात औंधचा भाग आता या प्रभागात नाही. या प्रभागात बोपोडी परिसराचे जवळपास 50 हजार मतदार असून, मॉडेल कॉलनी परिसराचे 8 हजार मतदार आहेत.

झोपडपट्टीतील मतदारांचे वर्चस्व

बहुतांश झोपडपट्टी मतदारांचे वर्चस्व असलेल्या या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे बोपोडी भागाने शिवसेनेचा अपवाद वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय जनता पक्ष आणि रिपाइं अशा सर्वच पक्षांचे नगरसेवक गेल्या वीस-पंचवीस वर्षांत निवडून दिले आहेत. आता ज्या दोन प्रभागांची मोडतोड करून नवीन प्रभाग तयार झाला आहे, त्यात भाजपचेच विद्यमान नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाची लाट त्या पक्षाचा नगरसेवक या भागातून निवडून येण्याचा कल अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे. त्यामुळे या वेळेस नक्की कोणत्या पक्षाला बोपोडीकर संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे.

सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त

सद्य:स्थितीत भाजपकडून विद्यमान नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सुनील माने, सोनाली भोसले, रिपाइंकडून उपमहापौर सुनीता वाडेकर व परशुराम वाडेकर दोघेही इच्छुक असून, या प्रभागात दोन जागा मिळाव्यात, अशी रिपाइंची मागणी आहे.
राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, अर्चना कांबळे, करीम शेख, विजय जाधव, राजन निरभवणे, नितीन कांबळे, ज्योती बहिरट, अमोल जाधव तर काँग्रेसकडून राजेंद्र भुतडा, मनीष आनंद, इंद्रजित भालेराव, व्हिव्हियन केदारी, रमेश पवळे, विनोद रणपिसे, शिवसेनेकडून सचिन जाधव, अमोल निकुडे, गणेश शिंदे, कैलास गायकवाड, आदिती गायकवाड-कडू पाटील, मनोज भिंगारे, सारिका भिंगारे, किशोर वाघमारे तर मनसेकडून अंकित नाईक अशी इच्छुकांची नावे आहेत. शिक्षण मंडळाचे सदस्य अमित मुरकुटे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकंदरीत, सर्वच इच्छुकांची संख्या मोठी आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल आणि त्यानंतर आरक्षण सोडत यानंतरच नक्की चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

अशी आहे भौगोलिक रचना

प्रभाग क्र. 11 मध्ये बोपोडीचा संपूर्ण परिसर, भाऊ पाटील रोड, प्रगतीनगर, चिखलवाडी, स्पायसर कॉलेज रस्ता, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे विद्यापीठ परिसर, जवाहरनगर, यशंवतनगर, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर.

  • एकूण लोकसंख्या : 57,861
  • अनुसूचित जाती : 12 हजार 693

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT