पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमका अभ्यासक्रम कसा असावा, याचा एक आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये चिमुकल्यांचा प्रवेश आता 'बालवाटिकां' मध्ये करण्यात येणार असून त्यांना खेळ आधारित द़ृष्टिकोनाद्वारे संख्याज्ञान विकसित करून बालकांमध्ये बोधात्मक आणि भाषिक क्षमता विकसित करून बालकांना तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पूर्वप्राथमिक वर्गात वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर प्रत्येक बालक प्रवेश घेईल यालाच 'बालवाटिका' संबोधले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी 'उन्मुख' ही शिक्षक मार्गदर्शिका जाहीर केली आहे. त्यामध्ये बालशिक्षण केंद्रातील 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 या वयोगटाच्या वर्गांना बालवाटिका असे संबोधले आहे. विद्या प्राधिकरणा मार्फत जाहीर केलेल्या आराखड्या मध्ये भाषा, इंग्रजी, गणित, कलाशिक्षण, कार्यशिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आदी विषयांचा अभ्यासक्रम कसा असावा, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पायाभूत स्तरावर सर्वंकष द़ृष्टीने सक्षम बनविण्यासाठी अध्ययन अनुभव समृद्ध केलेले आहेत.
त्यामध्ये विविध उपक्रमांचा अंतर्भाव केलेला आहे. पायाभूत स्तर 3 ते 4, 4 ते 5 व 5 ते 6 साठी बालकेंद्रित, कृती आधारित आनंददायी व मनोरंजक पद्धतीने कथा, कविता, नाट्यछटा, गंमतगाणी, मुखवटे, यमकयुक्त गाणी, बाहुली खेळ तसेच परिसरीय आणि सांस्कृतिक ठेवा असलेली गाणी, कविता इत्यादींचा समावेश केला आहे. तसेच, 6 ते 7 व 7 ते 8 वर्षे वयोगटातील बालकांसाठी नाट्यीकरण, गोष्ट खेळासाठी साखळ्या तयार करून प्राणी, वस्तू इत्यादीशी संबंधित संभाषण, वर्णन, चित्रवाचन, अनुभवकथन व पात्रयुक्त कथन इत्यादी. तसेच, विशिष्ट प्रकारची गाणी, प्रेरणा मित्र, कोडी, चित्र, भाषिक खेळ स्वनिर्मित यमकयुक्त कविता तयार करणे, स्व- अभिव्यक्ती इत्यादींचासुद्धा समावेश केला आहे, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा