पुणे: मैत्रिणीकडून होणार्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणार्या तरुणाने नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिक शेट्टीयार असे तरुणाचे नाव आहे.
कार्तिक याला त्याची मैत्रीण पैशांसाठी तगादा लावून त्रास देत होती. तसेच, फोटो, रेकॉर्डिंग व्हायरल करून वैयक्तिक आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी देत होती. तिने कार्तिक याच्याकडून वेळोवेळी 27 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, ज्या दिवशी कार्तिक याने गळफास घेतला तेव्हा ती त्याच्यासोबत लॉजवरील खोलीत होती. (Latest Pune News)
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी साक्षी बाळू वाघचौरे (वय 23, रा. अचानक चौक, वारजे) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कार्तिक याचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव बुद्रुक नवले पुलाजवळील इंडिया गेट या लॉजवर 30 एप्रिल रोजी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हा जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होता. 13 ऑक्टोबर रोजी त्याचा साक्षीसोबत वाढदिवसाच्या दिवशी परिचय झाला होता. साक्षी ही नृत्याचे कार्यक्रम करते. पुढे दोघांत मैत्री झाली. 30 एप्रिल रोजी साक्षी आणि कार्तिक हे दोघे नवले पुलाजवळील इंडिया गेट या लॉजवर एकत्र थांबले होते.
दोन- तीन दिवसापासून ते तेथेच राहात होते. त्या दिवशी दोघांत वाद झाला. साक्षी बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी खोलीत कार्तिक याने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकचे नातेवाइक आणि मित्रांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
रुग्णालयाकडून सिंहगड रोड पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ तंगराज यांना कार्तिकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली, त्या वेळी ते चेन्नई येथे होते. याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीअंती साक्षी वाघचौरे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तंगराज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांनी कार्तिकला याबाबत विचारले होते. त्या वेळी त्याने साक्षी आपली मैत्रीण असल्याचे सांगितले. तिचा फोन आला की कार्तिक बाहेर निघून जात असे. तो बाहेर गेला नाही तर साक्षी त्याला व्हिडीओ कॉल करत असे. कार्तिकच्या मित्राने त्यांना सांगितले, एप्रिल महिन्यात साक्षीला घेऊन येण्यासाठी तो आणि कार्तिक दोघे इंदापूरला गेले होते. मला घर पाहिजे, त्यासाठी तू मला पैसे दे, असा तगादा लावत होती.
कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या दोघा -तिघा मित्रांनी वेळोवेळी साक्षीला 27 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे दिले आहेत. तंगराज यांना साक्षीबाबत समजले होते. त्यांनी कार्तिकला विचारणा केली. त्या वेळी त्याने सांगितले की, साक्षी वाघचौरे नावाची माझी मैत्रीण असून, ती मला भेटण्यासाठी आणि पैशांसाठी त्रास देत आहे. तिच्या त्रासाला मी कंटाळलो असून, तिच्या त्रासामुळे जिवाचे बरे-वाईट करावे वाटत आहे. त्या वेळी आम्ही त्याची समजूत काढली होती.
मात्र, त्यानंतर कार्तिक याने 30 एप्रिल रोजी रात्री इंडिया गेट लॉजवर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिक याच्या आत्महत्येस साक्षी कारणीभूत असल्याचा आरोप करत तंगराज यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इंडिया गेट लॉजवर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका तरुणीच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, चौकशीअंती याबाबत गुन्हा दाखल केला आहे.- दिलीप दाईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे