

पुणे: शहरात गुरुवारी (दि. 12) रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे नवले पूल परिसरातील एका नाल्यातून ज्येष्ठ महिला वाहून गेल्याची घटना घडली. रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने महिला नाल्यात पडली.
पाण्याचा वेग जास्त असल्याने क्षणात महिला पुढे वाहून गेली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस, अग्निशमन दलाने धाव घेत शोधकार्य सुरू केले होते. त्या महिलेचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्यात सापडला. (Latest Pune News)
शोभा मनोहर महिमाने (वय 65, रा. फुरसुंगी) असे संबंधित महिलेचे नाव आहे. महिमाने ह्या गुरुवारी एका लग्नासाठी पिंपरीतील त्यांच्या नातेवाइकांसह खासगी वाहनाने कोल्हापूरला गेल्या होत्या. त्याच वाहनाने त्या पुण्यात रात्री दहाच्या सुमारास नवले पूल येथे उतरल्या. त्या वेळी शहरात मोठा पाऊस पडत होता. काही मिनिटांत रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले होते.
शोभा ह्या फुरसुंगी येथील घरी जाण्यासाठी रिक्षा करण्याच्या प्रयत्नात रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी पावसामुळे साचलेल्या पाण्यात रस्ता नीट दिसत नसल्याने आणि अंदाज न आल्याने त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्या.
नाल्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्या क्षणातच वाहून गेल्या. त्या वेळी तेथे उपस्थित एका कारचालकासह तिघांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. संबंधित दोनशे मीटर नाला हा पुढे जाऊन ओढ्याला मिळतो. त्यामुळे त्या प्रवाहात पुढे वाहून गेल्या.
याबाबतची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिस, अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. शुक्रवारी वारजे स्मशानभूमीजवळ त्यांचा मृतदेह पाण्यात सापडला.
सिम कार्डवरून पटली ओळख
शोध मोहीम सुरू असताना पोलिसांना महिलेचा मोबाईल मिळाला. पाणी गेल्याने मोबाईल बंद पडला होता. पोलिसांनी मोबाईलमधील सिम कार्डवरून महिलेची ओळख पटवली. दरम्यान, शोध मोहीम सुरू असताना पुलाजवळील परिसरात शोभा यांची एक चप्पल अग्निशमन दलाच्या जवानांना सापडली. त्या मार्गावरून अग्निशमन दलाने पुढे प्रयेजा सिटी, सिंहगड रोड तसेच सिंहगड अग्निशमन केंद्राशेजारील भागात शोधकार्य सुरू ठेवले आहे.