Pune Tipu Sultan controversy
पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी जमलेले भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेस भवन परिसरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्याचे रूपांतर नंतर गोंधळ आणि संघर्षात झाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी "छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे काम समकक्ष आहे" असे विधान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विधानाच्या निषेधार्थ भाजपने पुण्यात आंदोलन पुकारले. भाजपने सपकाळ यांचा टिपू सुलतानच्या वेशभूषेतील मॉर्फ केलेला फोटो पोस्टर्सवर लावून त्याला 'जोडे मारो' आंदोलन केले. तसेच काँग्रेस भवनासमोर "झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा" अशा आशयाचे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला.
दुसरीकडे, काँग्रेसने हे आंदोलन चुकीचे असल्याचे सांगत सपकाळ यांचे समर्थन केले आहे. "भाजपनेही यापूर्वी टिपू सुलतानच्या फोटोंचा वापर केला आहे, त्यावर भाजप काय उत्तर देणार?" असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. तसेच, पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'एपस्टाईन फाइल्स' संदर्भात पंतप्रधान मोदींवर झालेल्या आरोपांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप हे स्टंट करत असल्याचा प्रतिआरोप करण्यात आला.
भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनमध्ये रोखून धरले.
या राड्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू केले आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.