मंचर: श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग परिसरात बुधवारी (दि. 23) पहाटे थरारक प्रकार घडला. गावातील शेटेमळा हद्दीत असलेल्या माजी सरपंच सुखदेव नाना शेटे यांच्या घरासमोरील ओट्यावरून थेट जनावरांच्या गोठ्यात शिरणारे तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाले. एकाच वेळी तीन बिबटे घरासमोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Pune News)
बुधवारी पहाटे सव्वा वाजता हे तीन बिबटे घरासमोरील ओट्यावरून दबक्या पावलांनी जनावरांच्या गोठ्याकडे गेले. त्यांच्या दृष्टीने गोठ्यातील वासरू सहज शिकार ठरणार होते. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून गोठ्यात झोपलेल्या शेतकर्याला एकाएकी हालचाल व आवाजामुळे जाग आली.
शेतकर्याने प्रसंगावधान राखत जोरजोरात आरडाओरडा केला आणि जवळच असलेली काठी आपटून बिबट्यांना हुसकावून लावले. त्यामुळे वासरू आणि इतर जनावरांचा जीव वाचला. या शेतकर्याच्या धाडसाचे कौतूक होत आहे. मात्र, गावात एकाच वेळी तीन बिबटे शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचे सायंकाळी व रात्रीचे घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद झाले आहे. तातडीने पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
बिबट्यांची नागरी वस्तीत घुसखोरी वाढली
वडगाव काशिंबेग परिसरात ओढे, नाले, ऊसशेती व अन्नसाखळीमुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. आता हे प्राणी थेट नागरी वस्तीतही शिरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन खात्याने तत्काळ पिंजरे लावावेत आणि बिबट्यांना पकडावे, अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी केली आहे.