Rain impact on fishing
चाकण: आखाडाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारासाठी मासे व मटणखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असली, तरी पावसामुळे मच्छीमार बांधव मात्र निराश झाले आहेत. बुधवारी (दि. 23) दुपारपासून खेड तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी लागल्यामुळे नदी-ओढ्यांमधील पाणीपातळी वाढली. परिणामी, नेहमीप्रमाणे मासे मिळवण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि मासे बाजारात अत्यल्प प्रमाणात पोहचले.
माशांची आवक कमी झाल्याने त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः चिलापी व मिरगल यासारख्या लोकप्रिय माशांचे दर दीडपट वाढले आहेत. 100 रुपये किलो दराने मिळणारी चिलापी मासे आता 150 रुपये किलो दरानेही सहज मिळत नाहीत, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी दिली. (Latest Pune News)
दरम्यान, श्रावण महिना सुरू होत असल्याने मांसाहार टाळणार्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे लवकरच माशांच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता मासेमार व्यक्त करीत आहेत.
पावसाची दमदार हजेरी
मागील काही दिवसांपासून खंडित झालेला पाऊस बुधवारी खेड तालुक्यात पुन्हा सक्रिय झाला. गुरुवारीही (दि. 24) सकाळपासूनच अनेक भागांत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. संततधार पावसामुळे चाकण व परिसरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असून, मासेमारीसारख्या व्यवसायावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होताना दिसत आहे.