

खुटबाव: दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार करणारा आरोपी बाळासाहेब मांडेकर यासह तीन आरोपींना यवत पोलिसांनी बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुणे येथून अटक केली होती, तर चौथा आरोपी फरारी होता.
त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी तीन आरोपींना दौंड न्यायालयाने सोमवार (दि. 28) पर्यंत 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. (Latest Pune News)
गोळीबाराची घटना 21 जुलै रोजी रात्री 11:30 दरम्यान घडली होती. आरोपी बाळासाहेब मांडेकर हा भोर-वेल्हे-मुळशीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ही घटना प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर यवत पोलिस खडबडून जागे झाले होते. अंबिका कला केंद्रात रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती. ज्यामध्ये पाच महिला उपस्थित होत्या.
कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे हे गेटवर उभे असताना तेथील कामगार युवराज चंदन याने धावत येत अंधारे यांना सांगितले की, अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे. त्यानंतर तिला त्वरित दवाखान्यात पाठवले. व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी चौकशी केली असता त्यांना समजले की, आरोपी बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला.
गोळी भिंत व छतावर आदळली. यामुळे आरोपी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी पाहणी केली असता भिंत व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसले आणि फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा सापडला, तो ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केला असल्याचे कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे करीत आहेत.