पुणे

यंदा राज्यात होणार साखरेचे उदंड उत्पादन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात चालूवर्षी सुमारे एक हजार 96 लाख मे. टन ऊस गाळप आणि 112 लाख टन साखर उत्पादनाच्या वर्तविलेल्या अंदाजापेक्षा राज्यात अधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादन होत असल्याचा सुधारित अंदाज आहे. त्यानुसार 1170 ते 1200 लाख मे. टन ऊस गाळप आणि सुमारे 118 ते 120 लाख मे.टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. म्हणजेच सुमारे शंभर लाख मे. टन ऊस गाळप अधिक होत असून इथेनॉलकडे ऊस उत्पादन वळवूनही राज्यांत साखर उत्पादन उदंड होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप हंगाम 2021-22 च्या धोरणाची बैठक मुंबईत 13 सप्टेंबर 2021 रोजी झाली होती. त्यामध्ये हंगामातील अपेक्षित उत्पादनाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यापेक्षा अधिक उत्पादन होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. साखर आयुक्तालयात नुकतीच ऊस गाळप हंगाम आढावा बैठक कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापकांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये उपलब्ध माहितीनुसार जादा उत्पादनावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या बाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, उसाची हेक्टरी उत्पादकता आपण 97 मे टन अपेक्षित धरली होती. मात्र, पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे त्याचा फायदा ऊस पिकास झाला आहे. त्यातून सरासरी 110 ते 115 मे. टनापर्यंत ऊस उत्पादकता मिळत आहे. त्यामुळेच ऊस उपलब्धता वाढून सुमारे 118 ते 120 लाख मे.टनाइतके साखर उत्पादन तयार होण्याची अपेक्षा आहे.

105 लाख टन साखर उत्पादन तयार

दरम्यान, राज्यात सद्यस्थितीमध्ये 1 हजार 12 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.32 टक्क्यांइतक्या सरासरी उतार्‍यानुसार 105 लाख मे. टन इतके साखर उत्पादन तयार झाल्याचे नमूद करुन ते म्हणाले की, सद्यस्थितीत इथेनॉलकडे अधिकाधिक ऊस वळवूनही राज्यांत सुमारे नऊ लाख टन साखर उत्पादन कमी करण्यात सध्या यश आले आहे. तसेच खांडसरी प्रकल्पांनी आत्तापर्यंत आठ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. या शिवाय रसवंती, ऊस बेणं आदींसाठीही ऊसाचा वापर होतो. त्यातून संपुर्ण उसाचे गाळप कारखान्यांकडून निश्चित होईल, असे नियोजन केले आहे.

कोल्हापूर विभागातील साखर कारखाने ऊस गाळप पूर्ण झाल्याने बंद होण्यास सुरुवात झालेली आहे. सोलापूरमधील कारखान्यांकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस आणून गाळप सुरु आहे. तसेच बंद झालेल्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोड टोळ्या आणून वेळेत ऊस तोडणी करण्यास कारखाने प्राधान्य देत आहे. मार्च महिनाअखेर एकूणच ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT