पुणे

यंदा ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची धूम; तरुण जोडप्यांकडून आवडत्या ठिकाणांना प्राधान्य

Laxman Dhenge
पुणे : स्नेहल-अमितचे लग्न नुकतेच लोणावळा येथे झाले, तेही रॉयल थीमनुसार. ही थीम अनेकांच्या पसंतीस उतरली. सध्या लग्नसराईचा सीझन असल्यामुळे तरुण जोडपी आपल्या आवडत्या ठिकाणी 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्यास पसंती देत आहेत. 'डेस्टिनेशन वेडिंग'ची यंदा धूम असून, महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, मुळशी, भूगाव, पानशेत यांसह केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील विविध शहरांमध्ये यासाठी बुकिंग झाले आहे. इव्हेंट कंपन्याही कामाला लागल्या आहेत. जोडप्यांनी पसंत केलेल्या बॉलीवूडपासून ते कार्निव्हलपर्यंतच्या थीमनुसार लग्न केले जात आहे.
सध्याच्या लग्नसराईमध्ये वेगळ्या पद्धतीने आवडत्या थीमनुसार आणि आवडत्या ठिकाणी लग्न करण्यावर तरुण जोडपी भर देत आहेत. आपल्या स्वप्नातील लग्नाला साकार करण्याचे निमित्त ते साधत आहेत. त्यामुळेच डेस्टिनेशन वेडिंगला यंदाच्या लग्नसराईत सर्वाधिक पसंती आहे. पुण्यात डिसेंबर महिन्यात अंदाजे 50 ते 55 डेस्टिनेशन वेडिंग होणार आहेत. पुण्याजवळील काही रिसॉर्ट, लॉन्समध्ये असे लग्न होत आहेत.  लग्नासाठी जवळपास 20 लाख ते अडीच कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जात आहे.
याविषयी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, सध्याच्या लग्नसराईसाठी बँक्वेट हॉलपासून ते मंगल कार्यालयांपर्यंतचे बुकिंग झाले आहे. केटरिंगपासून ते मंडप व्यावसायिकांपर्यंत सर्वजण लग्नसराईच्या कामात व्यग्र आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याही डेस्टिनेशन वेडिंगच्या कामात व्यग्र असून, जोडप्यांना आवडत असलेल्या ठिकाणी आणि त्यांच्या आवडत्या थीमनुसार नियोजन केले जात आहे. पुण्यात जवळपास असलेल्या भूगाव, लोणावळा, मुळशी, पानशेत, भोर, भीमाशंकर यांसह महाबळेश्वर आणि पाचगणी येथेही असे लग्न होत आहेत.
  • जवळपास 300 ते 500 लोकांचे नियोजन
  • इव्हेंट कंपन्यांकडून लग्नाचे सर्व नियोजन
  • तीन-तीन दिवस चालताहेत लग्न सोहळे
  • पुण्यात 70 ते 80 इव्हेंट कंपन्या वेडिंसाठी करताहेत काम
 कार्निव्हल, रॉयल, टर्किश, बॉलीवूड, हॉलीवूड थीमनुसार लग्न केले जात आहेत. जोडप्यांनी सांगितलेल्या थीमप्रमाणे सजावट करण्यापासून ते संगीताच्या कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंत… केटरिंगपासून ते मेकअपपर्यंतचे सर्व नियोजन इव्हेंट कंपन्या करीत आहेत. एका लग्नाच्या नियोजनासाठी 20 ते 30 जणांची टीम काम करत आहे आणि 15 दिवसांची मेहनत करून जोडप्यांचे डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करीत आहेत.
– निखिल कटारिया, सदस्य, इव्हेंट अ‍ॅण्ड  एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोशिएशन
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT