पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी टीईटी परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून, यंदा परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षांत टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी परीक्षा देखील ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी संबंधित उमेदवार करीत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु, प्रश्नसंचाबद्दल येत असलेल्या अडचणी आणि कमी कालावधी, याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा घेण्यासाठी किमान एक महिना आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिध्द करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठकव्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. त्यातच आता राज्यात लोकसभा आणि विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे संबंधित कामकाजासाठी काही कर्मचारी जाणार आहेत. तरीदेखील राज्यात टीईटी परीक्षा घेण्यासाठीची कार्यशाळा पार पडली असून, आता लवकरच परीक्षेची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार होता. परंतु, तांत्रिक कारणांमुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून, अधिकार्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की
घेण्यात येईल.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.