पुणे: वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रासले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मिसिंग लिंक रस्त्याची कामे केली जात आहेत.
पुण्यातील एकलव्य कॉलेज येथील 15 मीटर डीपी रस्त्यामधील असलेली शेवटची अडचण दूर झाली असून, या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा रस्ता झाल्यास पौड रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार असून, वाहतुकीचा वेग देखील वाढणार आहे. (Latest Pune News)
कोथरूडमधील एकलव्य महाविद्यालयापासून कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाकडे जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध होणार आहे. येथील विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित 15 मीटर रुंद रस्त्यासाठीच्या भूसंपादनातील शेवटचा अडथळा दूर झाला आहे. बांदल यांची येथील सुमारे दोन गुंठे जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. पथ विभागामार्फत या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, आशिष गार्डन येथून गुरू गणेशनगर, सुरजनगर, कुंबरे पार्क, एकलव्य महाविद्यालयापर्यंत डीपी रस्ता आहे. हा 15 मीटर रुंदीचा रस्ता एकलव्यपासून पुढे बाह्यवळण मार्गाला मिळणे प्रस्तावित होते.
हा मार्ग भूसंपादनाअभावी रखडला होता. मात्र, बांदल कुटुंबीयांची दोन गुंठे जागा मिळाल्याने आता हा रस्ता तयार होऊन पौड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या रस्त्याचे काही दिवसांत डांबरीकरण करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे पथ विभागप्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.
हा रस्ता झाल्यामुळे पौड रस्त्यावरून किंवा महात्मा सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावरून बाह्यवळण मार्गाला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होऊन या दोन रस्त्यांवरील वर्दळ कमी होणार आहे.
30 मिसिंग लिंकसाठी लागणार 800 कोटी
पुण्यात विविध भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 30 मिसिंग लिंकची यादी तयार करण्यात आली आहे. या मिसिंग लिंकच्या मार्गातील अडथळे दूर करून लवकरच त्यांची कामे सुरू केली जाणार आहे. यातील 6 मार्गांसाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. तसेच, सर्व रस्त्यांच्या कामासाठी साधारण 800 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, आशिष गार्डन येथून गुरू गणेशनगर, सुरजनगर, कुंबरे पार्क, एकलव्य महाविद्यालयापर्यंत असलेला डीपी रस्ता झाल्यास पौड रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार आहे. साधारण 10 ते 12 टक्के वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पौड रस्त्यावरून रोज 1 लाख 10 हजार वाहने रोज धावतात. डीपी रस्ता पूर्ण झाल्यास वाहतुकीची संख्या ही 90 ते 95 हजारांवर येणार आहे. या मार्गावरील सरासरी वाहतुकीचा वेग 21 ते 22 किमी आहे. हा मार्ग झाल्यास हा वेग 23 ते 24 किमीपर्यंत येईल.- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त