पुणे

शहर काँग्रेसमध्ये होणार मनोमिलन! प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातंर्गत पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच आता पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी सोपविली आहे. या नेत्याने पदाधिकार्‍यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी आता स्नेहभोजनाचे आयोजन केले असून त्यासाठी प्रमुख पन्नास जणांना निमंत्रित केले आहे.
लोकसभा निवडणुका जेमतेम महिना- दीड महिन्यावर येऊन ठेपल्या असल्या तरी शहर काँग्रेसमधील गटबाजीचे चित्र कायम आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा फटका निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

एकीकडे भाजपसारख्या मातब्बर पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान समोर असणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील गटबाजी रोखून निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ही गटबाजी रोखण्यासाठी अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार आता पवार यांनी शहरातील सर्व पदाधिकार्‍यांचे मनोमिलन करण्यासाठी येत्या 24 जानेवारीला स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

त्यासाठी काँग्रेसमधील पन्नास पदाधिकार्‍यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रत केले आहे. या भोजनाच्या निमित्ताने सर्व पदाधिकार्‍यांना एकत्र आणून त्यांचा संवाद घडवून आणण्याचे नियोजन आहे. त्या माध्यमातूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला अप्रत्यक्षरित्या शहर काँग्रेसची सुरुवात होणार आहे. येत्या डी. पी रस्त्यावरील घरकुल लॉन्समध्ये या स्नेहभोजन समारंभाचे आयोजन केले आहे. या भोजनासाठी किती जण उपस्थित राहणार आणि ते कसा प्रतिसाद देणार यावरच शहर काँग्रेसमध्ये मनोमिलन होणार का कि गटबाजी कायम राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT