गावे होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम; भारत फोर्जचा उपक्रम | पुढारी

गावे होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम; भारत फोर्जचा उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गावखेड्यातील नागरिक शिक्षण, पाणी, कृषिविकास आणि रोजगारदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी भारत फोर्ज समूहाने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शंभर गावांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता रोजगारासाठी गावाबाहेर गेलेली कुटुंबे पुन्हा माघारी फिरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भारत फोर्जच्या नेतृत्वाखाली गावांमध्येच उत्तमोत्तम सुविधा निर्माण होतील, याकडे लक्ष दिले जात आहे.

भारत फोर्जने 900 हून अधिक महिला उद्योजकांना सक्षम केले आहे. सोबतच गावातील पाण्याची उपलब्धता वाढावी, यासाठी दुष्काळग्रस्त गावांमध्ये साठवणक्षमता निर्माण करण्यासाठी कामे केली जात आहेत. या माध्यमातून 2,625 टीसीएम (हजार घनफूट) पाणी साठवणक्षमता निर्माण करण्यात येणार आहे. पिण्यायोग्य पाणी, कृषी साहाय्य, आरोग्य सेवा वाढविणे, शिक्षणाची प्रगती, अंतर्गत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून ही शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या प्रसंगी भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, “समाज हा आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये आमच्या वाढीसाठी या समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. हे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्रात शाश्वत गावे निर्माण करण्यात येत आहेत. या 100 गावांचे परिवर्तन करताना आम्ही निसर्गही जोपासत आहोत.
भारत फोर्जचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, गावविकासासाठी आमची बांधिलकी आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून आम्ही एक आदर्श प्रस्थापित करू. येणार्‍या पिढ्यांसाठी शाश्वत प्रगतीचा मार्ग निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या तालुक्यांना होणार फायदा…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 13, बारामती आणि दौंडमधील 8, पुरंदर तालुक्यातील 25 गावांना भारत फोर्जने हाती घेतलेल्या कामांचा फायदा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 10, तर शेवगावमधील 6 गावांमध्ये कामे सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण, खटाव आणि कराडमधील 32, सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील 6 गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button