विद्युत रोहित्रे गायब... परवानगी नाही... नोंद नाही; मग नेली कुणी? पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान Pudhari
पुणे

Koregaon Bhima: विद्युत रोहित्रे गायब... परवानगी नाही... नोंद नाही; मग नेली कुणी? पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

संशयाचा भोवरा महावितरणभोवती! ‘अज्ञात’चोर अन् ‘मौन’ यंत्रणा

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव भीमा: लोणीकंद-वाघोली (ता. हवेली) महावितरण शाखेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या क्षमतेची विद्युत रोहित्रे एकामागोमाग एक गायब होण्याच्या घटना समोर येत आहेत. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3 रोहित्रे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे केवळ चोरीचा मुद्दा समोर आलेला नसून, महावितरणच्या यंत्रणेमधील अंतर्गत संगनमताचा संशयही अधिक बळावला आहे.

या तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी अद्याप कोणताही आरोपी निष्पन्न झालेला नाही. त्यामुळे लोणीकंद-वाघोली पोलिसांसमोरही या गुन्ह्यांचा तपास करणे मोठे आव्हान ठरत आहे. (Latest Pune News)

एप्रिल 2025 मध्ये वाघोलीतील गेरा वर्ल्ड ऑफ जॉय या गृहप्रकल्पामध्ये वर्ष 2019 साली बसवलेले 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र गायब झाले. ते रोहित्र 2020 पासून निष्क्रिय होते. मात्र, गतीशक्ती अ‍ॅपवरील मॅपिंगदरम्यान एप्रिल महिन्यात ते रोहित्र तेथून पूर्णतः गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत रोहित्र हटविण्याची कोणतीही नोंद महावितरणकडे नव्हती.

दुसर्‍या घटनेत 13 मे 2025 रोजी लोणीकंद परिसरातील शिंदे स्टोन क्रशरजवळील डीपीवर बसविलेले 315 केव्हीए क्षमतेचे रोहित्र आणि त्याचे स्ट्रक्चर गायब असल्याचे उघड झाले. हे कनेक्शन काही वर्षांपासून बंद होते. गतीशक्ती अ‍ॅपच्या सर्वेक्षणादरम्यान ही बाब निदर्शनास आल्यानंतर सहायक अभियंता दीपक बाबर यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तिसर्‍या प्रकरणात वढू येथे 100 केव्ही क्षमतेच्या मंजुरीवर प्रत्यक्षात 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आल्याचे आढळून आले. याबाबत पेरणे शाखेने अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली असली, तरी कोणत्या अधिकार्‍याच्या आदेशाने रोहित्र बदलण्यात आले, कुठल्या कारणासाठी अधिक क्षमतेचे रोहित्र वापरले, याची स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.

या तिन्ही घटनांमध्ये एक बाब समान आहे. रोहित्र गायब होते आणि प्रत्येकवेळी ङ्गअज्ञात आरोपीङ्घच्या नावावर पोलिसात तक्रार दाखल होते. मात्र, ही कामे सामान्य व्यक्ती करू शकत नाहीत. रोहित्र हलविण्यासाठी विशेष तांत्रिक ज्ञान, अधिकृत मंजुरी आणि यंत्रणेशी समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे या चोरीच्या घटनांमागे महावितरणमधील अंतर्गत अधिकारी, कर्मचार्‍यांचा हात आहे का? याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी होत आहे.

महावितरणने या घटनांमध्ये केवळ पोलिसांत तक्रार दाखल करून हात झटकले आहेत. मात्र, पोलिस तपासासाठी आवश्यक दस्तऐवज, कामकाजाच्या नोंदी, सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती अथवा संबंधित कर्मचार्‍यांची चौकशीसंदर्भातील माहिती देणेही गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT