

पुणे: पुणे विमानतळावरील मालवाहतुकीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले असून, अवघ्या 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक विक्रमी 140 टन मालवाहतूक झाली आहे. यात विमानतळावर 72 टनाहून अधिक मालाची आवक तर 71 टनाहून अधिक मालाची जावक झाल्याची नोंद विमानतळ प्रशासनाने केली आहे.
गेले काही दिवसांपासून पुणे विमानतळावरील हवाई मालवाहतूक सातत्याने वाढत होत आहे. दि. ३ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ४ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत पुणे विमानतळावर आत्तापर्यंतची सर्वाधिक मालाची आवक आणि जावक झाली आहे. (Latest Pune News)
पुणे विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७२,७२६ किलो (७२.७३ मेट्रिक टन) मालाची आवक झाली आहे. तर, याच कालावधीत ७१,२३६ किलो (७१.२४ मेट्रिक टन) मालाची जावक झाली आहे. या वाढीमुळे स्थानिक उद्योगांना आणि व्यापाऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जाण्यास मदत मिळत आहे, तसेच शहराच्या आर्थिक विकासालाही गती मिळत आहे. भविष्यात या मालवाहतुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.