पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात प्रबोधनात्मक कार्यक्रमात 'आवाज संविधानाचा' हे कविसंमेलन झाले. त्यानंतर प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध लोकगायक मिलिंद शिंदे यांच्या बहारदार आवाजातील गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
कविसंमेलनात कवी प्रा. प्रशांत मोरे, डॉ. विनायक पवार, शमिभा पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, प्रवीणकुमार यांनी सहभाग घेतला. 'खोटं बोलून त्यांची झाली साखर तुमची झाली मळी, भूलथापांचे बळी हो तुम्ही भूलथापांचे बळी' ही कविता सादर करून विनायक पवार यांनी नागरिकांमध्ये सामाजिक द्वेष पसरवणार्या नेत्यांपासून सावध राहण्याचे आणि योग्य त्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले.
प्रशांत मोरे यांनी 'माय-मातीचा कायदा नाही लिहिला रातोराती, सार्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती' ही कविता सादर करून डॉ. आंबेडकरांनी केलेल्या अजरामर कार्याची आठवण करून दिली. कविसंमेलनानंतर मंजुषा शिंदे, संजय गोळे व धीरज वानखेडे यांचा प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम झाला. मिलिंद शिंदे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. त्यांच्या गीतांना नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
शमिभा पाटील यांनी 'मिस्टर आंबेडकर तुम्ही जबरदस्त ग्रंथ लिहिलात' ही कविता सादर केली. स्वप्नील चौधरी यांनी कर्जबाजारी बापाच्या मुलाची व्यथा मांडणारी 'गण्या' नावाची कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले. तर 'चला दंगल समजून घेऊ' या कवितेच्या माध्यमातून तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकावणार्यांना शाब्दिक चाबूक दिला. प्रवीणकुमार यांनी 'संविधान आता जपा यार हो' ही कविता सादर करून भारतातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे असा संदेश दिला. रोहित शिंगे आणि काजल कोथळीकर यांनी निवेदन केले.
हेही वाचा