पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवरील बंदीमुळे हळूहळू शाडू मातीच्या मूर्ती करण्याकडे मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांचा कल वाढू लागल्याचे दिसू लागले. परंतु, या वर्षी पीओपी मूर्तींवरील बंदी उठवली आहे. आतापर्यंत 45 टक्के पुणेकर हे शाडू मातीच्या मूर्तीकडे वळल्याचे आणि पुण्यात सुमारे 40 टक्के मूर्ती या शाडू मातीच्या विकल्या जात असल्याचे चित्र आहे. यंदाही पीओपी मूर्तींना परवानगी दिली असली तरी शाडू मातीच्या मूर्तींकडे कल असणार आहे. गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारही सज्ज असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शाडूच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात होणार आहे.
राज्य सरकारने पीओपी मूर्तींवरील बंदी उठवली असून, यंदा गणेशोत्सवात पीओपी मूर्तींचीही विक्री होणार आहे. असे असले तरी शाडू मातीच्या मूर्तींकडे पुणेकरांचा कल असेल, असे मूर्तिकारांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'ने शाडू मातीच्या मूर्तींच्या ट्रेंडविषयी जाणून घेतले. दरवर्षी एका मूर्तिकाराकडून 1 ते 2 हजार शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात, यंदाही मूर्तिकारांनी तयारी सुरू केली आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विक्रेते विनय फाळके म्हणाले की, जवळपास 45 टक्के पुणेकर हे शाडूच्या आणि लाल मातीच्या गणेशमूर्तींकडे वळले आहेत. आम्ही अशा मूर्तींची विक्री करतो. दरवर्षी सुमारे एक हजार मूर्ती विकल्या जातात. गेल्या वर्षीही एक हजार मूर्ती विकल्या गेल्या होत्या. यंदाही हेच चित्र असेल. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत. विनोद येलारपूरकर म्हणाले की, आमच्याकडे शाडू माती मूर्तींबाबत पुणेकर जागरूक झाले आहेत. सकारात्मक बदल लोकांमध्ये झाला असून, पीओपी मूर्तींना जरी परवानगी दिली तरी शाडूच्या मूर्तींना मागणी असेल.
मूर्तीसाठी बुकिंगलाही सुरुवात
राज्य सरकारने पीओपी मूर्तींवरील बंदी उठवली असल्याने पीओपी मूर्ती तयार करणार्या मूर्तिकारांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत मूर्तिकार केशव कुंभार म्हणाले की, पीओपी मूर्तींना दरवर्षी मोठी मागणी असते. आम्ही वर्षभर मूर्ती तयार करण्याचे काम करतो. दरवर्षी 18 ते 20 हजार मूर्ती विकल्या जातात. यंदाही 18 हजारांच्या आसपास पीओपी मूर्ती तयार केल्या असून, मूर्तीसाठी बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तींपेक्षा शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे कल वाढला आहे. लोकांमध्ये मातीच्या मूर्तींविषयी जनजागृती झाल्यामुळे अनेक जण शाडूच्या मूर्तींकडे वळले आहेत. यंदाही गणेशोत्सवात हेच चित्र पाहायला मिळेल. परंतु, मातीच्या मूर्तींकडे कल वाढला असला तरी मागणी तितका पुरवठा नसल्यामुळे दरवर्षी मोजक्याच शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. अधिकाधिक मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती तयार करण्याला भर दिला पाहिजे. पीओपी मूर्तींना जरी परवानगी दिली तरी शाडूच्या मूर्तींकडे पुणेकरांचा कल असेल.
– अभिजित धोंडफळे, मूर्तिकार
हेही वाचा :