पुणे

रस्ते होणार चकाचक; स्वच्छता, दुभाजकांच्या रंगरंगोटीमुळे रुपडे पालटणार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील प्रमुख 15 रस्ते आदर्श करण्याचे नियोजन केले असून, येत्या सोमवारपासून या सर्व रस्त्यांवरील राडारोडा उचलून ते अतिक्रमण मुक्त करण्याबरोबरच पाण्याने स्वच्छ करून दुभाजकांना रंगरंगोटी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. त्यामुळे पुढील आठवडाभरात आदर्श रस्त्यांचे रुपडं पालटणार आहे. महापालिकेने शहरातील 15 प्रमुख रस्ते आदर्श रस्ते म्हणून घोषित केले आहेत.

या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवर किमान तीन वर्षे कुठल्याही पद्धतीने खोदाई होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, दुभाजक आणि रोड फर्निचर आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यात येतील. यासोबतच अनधिकृत फलक, पोस्टर्स आणि ओव्हर हेड केबल मुक्त ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अतिक्रमण विभागाला या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार नगर रस्त्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

तसेच रस्त्यांवर उभी केलेल्या बेकायदा हातगाड्या देखील उचलण्यात आल्या. येरवड्यातील अवैध बांधकामे हटवण्यात आली. शहरातील 15 आदर्श रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रण होणार नाही, याची काळजी पालिका घेत आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे व मुंबई प्रमाणेच पुणे शहरातही महास्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून शहरातील आदर्श पंधरा रस्ते त्यावरील पदपथ, दुभाजक आदी स्वच्छ करून पाण्याने धुण्यात येणार आहेत.

या रस्त्यांचा आदर्श रस्त्यांत समावेश

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता, शिवाजी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. या संपूर्ण रस्त्यांची एकूण लांबी 92 किलोमीटर आहे. यात सर्वात मोठा रस्ता हा नगर रस्ता असून, याची लांबी सुमारे 14 किलोमीटर इतकी आहे. बाणेर रस्ता साडेसात किलोमीटर, कर्वे रस्ता सव्वा सहा किलोमीटर या रस्त्यांवर काम केले जाणार आहे. इतर रस्त्यांची लांबी साधारण तीन ते सात किमी इतकी आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT