पुणे

चक्क रस्ता गेला चोरीला..! सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर आरोप

Laxman Dhenge

भोर : पुढारी वृत्तसेवा : गवडी (ता. भोर) गावापर्यंतच्या रस्त्याचे काम न करता परस्पर 13 लाख 33 हजार 57 रुपयांचा निधी काढून घेतल्याने हा रस्ता चोरीला गेला आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या संदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती माजी सरपंच एकनाथ शिळीमकर यांनी दिली.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निखिल राजेशिर्के, बाप्पा साळुंके, चंद्रकांत कुमकर, दिलीप साळुंके, सुदाम साळुंके यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

एकनाथ शिळीमकर म्हणाले, गवडी ते प्रजिमा 142 मार्ग सा. क्र. 0 ते 1 (ग्रा.मा. 44) या रस्त्याच्या कामाची निविदा शासनाने काढली. या कामासाठी 13 लाख 33 हजार 57 रुपयांचा निधी मंजूर होता.  या कामासाठी ठेकेदार म्हणून ग्रामपंचायत गवडीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे होते. परंतु सद्यपरिस्थिती या रस्त्याचे कामच झाले नाही. सर्वांनी बांधकाम विभागाशी संगनमत करून रस्त्याचे काम न करता सगळा निधी हडप केला. त्यानंतर हा  भष्ट्राचार लपविण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दरम्यान, बांधकाम विभागाकडून या कामाची पाहणी करून 15 दिवस झाले तरी अद्यापि अहवाल देण्यात आलेला नाही. प्रशासन कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत, असे निवेदनात नमूद केल्याचे शिळीमकर यांनी सांगितले.

गवडी गावात जाणार्‍या रस्त्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही कोणतेही काम न करता निधी घेतलेला नाही. त्या कामाची वर्कऑर्डर, अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचा ठराव आहे. जीपीएस लोकेशनमधील काम केल्याचे फोटो आहेत. विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.

– काशिनाथ साळुंखे,

सरपंच, गवडी (ता. भोर) गवडी येथील रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचे निवेदन आले आहे. रस्त्याचे काम झालेले आहे किंवा नाही याची स्थळपाहणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. कामाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

– किरणकुमार धनावडे, गटविकास अधिकारी (भोर पंचायत समिती)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT