दर पडल्याने दुग्धोत्पादक हतबल..! अर्थकारण कोलमडले | पुढारी

दर पडल्याने दुग्धोत्पादक हतबल..! अर्थकारण कोलमडले

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : दुधाचे दर पडल्याने दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. दूध दर पडल्याने राज्य सरकारने 11 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान येणार्‍या दुधाला प्रतिलिटरमागे पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र, तेही अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या दुधाचे दर सरासरी 25 रुपये प्रतिलिटर असून, दुष्काळी परिस्थितीने चार्‍याचे व गोळी पेंडीचे दर वाढले आहेत. एक लिटर दूध निर्मितीसाठी 35 रुपये एवढा खर्च प्रतिलिटर येत असल्याचे शेतकर्‍यांनी दैनिक ‘पुढारी’ प्रतिनिधीला सांगितले.

अनेक बेरोजगार तरुणांनी दुग्धव्यवसायासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासाठी अनेकांनी बँकेचे कर्ज घेतले आहे. ते फेडणे मुश्कील बनले आहे. राज्य सरकारने दुधाचे दर प्रतिलिटर 40 रुपये करावेत, अशी दुग्धोत्पादकांची मागणी आहे. कारखान्यांचा हंगाम संपत आल्याने जनावरांना उसाचे वाढे मिळणे कठीण बनले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मका पिकावर मर्यादा दिसून येत असल्याने चारा महाग झाला आहे.

कमिशन कपातीचा शेतकर्‍यांना फटका

दौंड तालुक्यात एका खासगी दूध संस्थेने वाढीव दराने दूध घेत सर्वत्र पाय पसरले. मात्र, अँटिबायोटिक दूध सापडल्याच्या नावाखाली दूध उत्पादक शेतकर्‍यांची तीन रुपये, तर संस्थाचालकांचे एक रुपया कमिशन कपात करीत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा

Back to top button