पुणे: शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये साथरोगांची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेतर्फे साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये साथरोग औषध किट्स उपलब्ध ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या बाणेर येथील डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा सुसज्ज कक्ष तयार करण्यात आला आहे. (Latest Pune News)
तसेच, 24 तास सेवा देण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती साथरोग नियंत्रण विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव व आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
पाणी दूषित झाल्यास त्यापासून कॉलरा, विषमज्वर (टायफॉईड), उलट्या-जुलाब (गॅस्ट्रो), आमांश (डिसेंट्री) व कावीळ इ. आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माश्या बसून ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब होतात.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नळावाटे होणार्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. तर, बोअर वेल, कॅनॉलच्या शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
काय काळजी घ्यावी?
शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न खाऊ नये, तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर हात साबण व पाण्याने योग्य प्रकारे स्वच्छ धुवावेत.
सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करा व
पिण्यापूर्वी पाणी गाळून, 20 मिनिटे उकळून व
नंतर थंड करून प्यावे.
खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, लांब बाह्यांचे कपडे घालावे व मच्छरदाणीचा वापर करावा, डास चावू नयेत म्हणून खबरदारी घ्यावी.
पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून-पुसून कोरडे करून पुन्हा वापरणे व पाण्याचे साठे झाकून ठेवणे
घराभोवताली नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बादल्या, डबे, टायर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या या निरुपयोगी वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने या वस्तूंची विल्हेवाट लावून आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी
सर्व गृहनिर्माण सोसायटीमधील पंप व पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई करून घेण्यात यावी.
सार्वजनिक ठिकाणी जसे शाळा, महाविद्यालये यांना पुरविण्यात येणार्या पाण्याच्या टाक्यांची सफाई करावी.
नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, ओला व सुका कचर्याचे नियमित वर्गीकरण करावे.
जेथे कामगारवस्ती आहे त्या ठिकाणी अनावश्यक पाणी साठणार नाही, याची दक्षता बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावी.