बाणेर: बाणेर-बालेवाडी परिसर स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जातो. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण नसल्याने, तसेच आहेत त्यांची साफसफाईही व्यवस्थित झाली नसल्याने जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे सध्या अनेक रस्ते जलमय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे मापालिकेकडून पावसाळापूर्व करण्यात येणार्या साफसफाईच्या कामांची पोलखोल झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
परिसरातील रस्त्यांवर मंगळवारी (दि.20) आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीमध्ये ’प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात फिरण्यासाठी बोट द्यावी’, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर फिरत होत्या. (Latest Pune News)
स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठमोठे बजेट काढून मोठमोठी कामे दाखवली गेली. परंतु, पावसाळी लाइन व ड्रेनेजलाइनची कामे अपूर्णच असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे अवकाळी पावसातच रस्ते जलमय झाले आहेत. तसेच पाऊस नसतानाही अनेक ठिकाणी रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
बालेवाडी फाटा मुख्य रस्ता, बिटवाई चौक, जुपिटर हॉस्पिटल, शिवनेरी पार्क, ओमेगा रेसिडेन्सी रोड, बाणेर मुख्य रस्ता, बाणेर-पाषाण लिंक रोड, सूस रोड, बालाजी चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते. तरीही या भागातील पावसाळी लाइन व ड्रेनेजलाइनकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच ही कामे क्षेत्रीय कार्यालय करणार की मुख्य कार्यालय? याबाबतही अद्याप संभ्रम आहे.