पुणे

गर्भवतींना ससून रुग्णालयात ‘रेफर’ करण्याचे प्रमाण घटले; महापालिकेचा ‘ट्रान्स्फर प्लॅन’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात 'रेफर' केल्या जाणार्‍या गर्भवतींचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, अतिजोखमीच्या गर्भवतींची नियमित तपासणी, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता अशा उपाययोजना करण्यात आल्या. नियोजित 'ट्रान्स्फर प्लॅन'मुळे 300 गुंतागुंतीच्या प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच करण्यात यश मिळाले आहे. महापालिकेची 21 प्रसूतिगृहे, दवाखान्यांपैकी केवळ 6 दवाखान्यांमध्येच सिझेरियन सुविधा उपलब्ध आहे. इतर दवाखान्यांमधून अतिजोखमीच्या गर्भवतींची कमला नेहरूमध्ये, तर कमला नेहरूमधून ससूनला किंवा औंध रुग्णालयात रवानगी केली जाते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मागील वर्षी 'ट्रान्सफर प्लॅन' तयार करण्यात आला. यामध्ये मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, ऑडिट यावर भर देण्यात आला. त्यामुळे ससूनमध्ये रवानगी करण्याचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गर्भवतींची तपासणी, उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी केवळ 10-12 स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. सर्व प्रसूतीगृहांमधील गर्भवतींवर उपचार करता यावेत, यासाठी सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांना आठवड्याचे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. कमला नेहरू रुग्णालयातून 2021-22 मध्ये 977 गर्भवतींची रवानगी करण्यात आली. ते प्रमाण 2022-23 मध्ये 827 आणि 2023-24 मध्ये 365 पर्यंत खाली आले आहे. या वर्षीच्या आतापर्यंत केवळ 61 गर्भवतींना इतरत्र 'रेफर' करण्यात आले.

प्रसूतिगृहांच्या अंतर्गत ऑडिटमध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी नोंदणी करणार्‍या गर्भवती, दर महिन्याला होणार्‍या प्रसूती, अतिजोखमीच्या गर्भवतींची इतर रुग्णालयांमध्ये रवानगी केल्याची कारणे आणि त्यातील कोणती कारणे टाळता येऊ शकतात, याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. कोणत्या प्रसूतीगृहाने कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना कोणत्या दवाखान्यात पाठवावे, याचेही नियोजन करण्यात आले आहे. 'ट्रान्स्फर प्लॅन'ची काटेकोर अंमलबजावणी झाल्यामुळे जास्तीत जास्त प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केल्या जात आहेत.

– डॉ. लता त्रिंबके, वैद्यकीय अधीक्षक, प्रसूतिगृहे

गेल्या एका वर्षापासून प्रत्येक प्रसूती केंद्रात गुंतागुंतीच्या गर्भधारणेसाठी साप्ताहिक ओपीडी, यंत्रसामग्री आणि औषधांची खरेदी, भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञांसह मनुष्यबळाची नियुक्ती यासह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शक्य होत आहेत.

– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT