पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदापासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि पुनर्परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सराव होण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या असून, या प्रश्नपत्रिकांच्या आधारे शाळास्तरावरच प्रश्नपत्रिका तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी यासंदर्भातील
सूचना परिपत्रकाद्वारे राज्यातील विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांच्या प्रशासन अधिकार्यांना दिल्या.
पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षांबाबत राज्य नियंत्रण समितीची नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांना पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील, असे कळविण्यात आले होते. मात्र, प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिकचा सराव होण्यासाठी नमुना सराव प्रश्नपत्रिका, संविधानतक्ते राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. त्यांचा आधार घेऊन सर्व शाळांच्या व्यवस्थापनांनी प्रश्नपत्रिका तयार करून पाचवी व आठवीच्या परीक्षा घेण्याचे नमूद केले आहे.
हेही वाचा