The quality of work of ‘Smart City’ is approx 
पुणे

‘स्मार्ट सिटी’च्या कामाचा दर्जा सुमार

backup backup

पिंपरी : मिलिंद कांबळे : पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर भागात विविध कामे करण्यात आली आहेत; मात्र त्यांचा दर्जा सुमार असल्याचे ठिकठिकाणच्या पाहणीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून झालेली कामे किती महिने टिकणार? अशी शंका नागरिकांतून आताच उपस्थित केली जात आहे.

शहरातील नागरिकांचे राहणीमान अधिक सुलभ होऊन त्यांना जलद गतीने सुविधा मिळाव्यात या संकल्पनेतून 'स्मार्ट सिटी' अभियान राबविण्यात आले.

त्यासाठी पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या भागाची एरिया बेस डेव्हल्पमेंटसाठी (एबीडी) निवड झाली. त्याअंतर्गत तब्बल 511 कोटी 22 लाखांची कामे या भागात सुरू आहेत. बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत.

काँक्रीटचे स्मार्ट रस्ते करण्यात आले आहेत. खासगी वाहनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी पदपथ मोठे करून रस्ते छोटे करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील ड्रेनेजची अनेक झाकणे दबली आहेत.

स्मार्ट रस्ते व पदपथावर बिनदास्तपणे वाहने लावली जातात. रिक्षा थांबेही रस्त्यांवरच आहेत. तसेच, विक्रेते व दुकानदारही पदपथावर सामान व फलक ठेवतात. अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलास्तव रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. एक बस आली तरी, त्या रस्त्यावरील वाहतूक संथ होते.

वाहनांना अटकाव करण्यासाठी लावलेले बोलॉर्ड तुटले आहेत. स्मार्ट बस थांबे उभारले आहेत; मात्र त्यांचे एलईडी व दिवे तुटले आहेत. पदपथ तयार केल्यानंतर बस थांबे उभारण्यासाठी पुन्हा काँक्रीटकरण तोडण्यात येत आहेत.

त्यामुळे कामाचा दर्जा खराब होत आहे. काही ठिकाणी लावलेले ओपन जीमचे साहित्य तुटले आहे. काम करताना अनेक झाडे तोडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपळे गुरवमधील मंगल कार्यालय व सृष्टी चौकातील रस्त्यावर लावलेले अनेक ब्लॉक तुटले आहेत. काम पूर्ण होऊनही राडारोडा व साहित्य उचलले जात नसल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.

अंतर्गत कॉलनी व गल्लीचे जुने नामफलक तोडण्यात आले. काही फलक चोरीला गेले आहेत. नामफलक लावले जात नसल्याने बाहेरून आलेल्या व्यक्तींना पत्ता शोधण्यासाठी वणवण करावी लागते.

8 टू 80 पार्कमधील खेळणी नादुरूस्त विक्रम वेळेत बांधलेले सुदर्शननगर चौकातील 8 टू 80 पार्कमधील खेळणी दोन महिन्यातच नादुरुस्त झाली आहेत. .

ओपन जीमचे साहित्य तुटल्याने त्याचा वापर करता येत नाही. काही जीमचे साहित्य वाकल्याचे त्यांचा फायदा होत नाही. मनोर्‍यासाठी हलक्या प्रतीच्या लोखंडी जाळ्या वापरल्याने त्या तुटल्या आहेत. तसेच, सर्वत्र वाळू पसल्याने घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

दुभाजक नसल्याने अपघातांची शक्यता

डांबरी रस्त्यातील दुभाजक काढून पदपथ मोठे करण्यात आले आहेत. दुभाजकच गायब केल्याने वाहने वेगात जातात. तसेच, वाहनचालक अचानक डाव्या किंवा उजव्या बाजूस वळतात. त्यामुळे लहान व मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमध्ये 511 कोटी 22 लाखांची कामे

पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या एबीडी भागासाठी तब्बल 511 कोटी 22 लाख रूपये खर्चाचे विविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहेत.

त्यात सोलर पॉवर जनरेशन, बायसिकल शेअरिंग, स्मार्ट रोड (फुटपाथसह), सायकल जंक्शन डिझाईन, स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज, सेव्हर नेटवर्क, टु पार्क अ‍ॅन्ड पब्लीक टॉयलेटस (स्ट्रीट टॉयलेटसह) या कामांचा समावेश आहे. तर, पॅन सिटीत एकूण 867 कोटी 34 लाखांची कामे आहेत.

कामे पूर्ण करण्यावर भर : आयुक्त

रस्त्याची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कामे वेगात करण्यावर भर दिला आहे. अद्याप काही कामे सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होते.

जशी कामे पूर्ण होतील, तसे ती नागरिकांसाठी खुली केली जातात. नादुरूस्त कामे दुरूस्त केली जातील. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा मिळतील, असे महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT