पालेभाज्यांनी गाठली चाळिशी; अवकाळी पावसामुळे भाज्यांचा दर्जा घसरला Pudhari
पुणे

पालेभाज्यांनी गाठली चाळिशी; अवकाळी पावसामुळे भाज्यांचा दर्जा घसरला

भाज्यांच्या भावात दुपटीने वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पाऊस दमदार हजेरी लावत असल्याने त्याचा फटका पालेभाज्यांच्या उत्पादनाला बसत आहे. पावसाचा तडाखा बसल्याने जवळपास ऐंशी टक्क्यांहून अधिक पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून पालेभाज्यांच्या दरात तेजी आली आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव चाळिशीवर पोहोचले असून सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत. (Latest Pune News)

पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. याखेरीज, लातूर तसेच नाशिक परिसरातून कोथिंबीर मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असते.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे, बाजारात पावसाचा मार बसलेल्या पालेभाज्या दाखल होत आहे. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे. तेथून दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे.

मात्र, हे प्रमाण अवघे वीस टक्केच आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने पावसाने भिजलेल्या पालेभाज्या पंधरा ते वीस रुपये तर दर्जेदार पालेभाज्या वीस ते चाळीस रुपयांना मिळत असल्याची माहिती किरकोळ पालेभाज्यांचे विक्रेते सचिन कुलट यांनी दिली.

मान्सूपूर्व सरींपूर्वीच अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, यामध्ये दर्जाहिन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त आहे. यंदा पावसाने लवकर सुरवात केल्याने पालेभाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. शेतातून पालेभाज्या बाजारात व तेथून घरी जाईपर्यंत खराब होत असल्याने खरेदीदारांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.
- राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड.
पावसामुळे बाजारात नेहमीच्या तुलनेत दर्जेदार पालेभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. भिजलेला आणि दर्जाहिन माल खरेदीदारांकडून कमी प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. केवळ दर्जेदार मालाची खरेदीच ग्राहकांकडून करण्यात येत आहे. दर्जाहिन मालाची कमी भावाने विक्री होत आहे. त्याचा शेतक-यांना फटका बसत असून, नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
- चरण वणवे, भाजी विक्रेते, शनिपार चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT