पुणे

पोलिसी नजरेने हेरले अन् अपहरणाचा कट उधळला; वडील, भाऊ असल्याची केली होती बतावणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे  तीन दिवसांपूर्वी सिंहगड एक्स्प्रेसने पुण्याकडे प्रवास करीत होते. 30 वर्षांचा एक तरुण सात-आठ वर्षांच्या मुलीला घेऊन निघाला होता. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. ननवरे यांची नजर तिच्याकडे गेली. पोलिसी नजरेने अचूक हेरले. तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्यातील पोलिस जागा झाला. मुलीला विश्वासात घेऊन ननवरे यांनी माहिती घेतली तेव्हा मुलीचे अपहरण करून तरुण आपल्यासोबत घेऊन चालल्याचे पुढे आले आहे.

ननवरे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे संबंधित मुलगी घरच्यांकडे सुखरूप पोहचली आहे. सहायक पोलिस निरीक्षक ननवरे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. गुरुवारी (दि. 8) ते सिंहगड एक्स्प्रेसने पुण्याकडे येत होते. न्यायालयात त्यांची साक्ष होती. एक 30 वर्षीय तरुण सात-आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तो मुलीला ठिक-ठिकाणी खायला घेऊन देत होता. मात्र, मुलगी शालेय गणवेशात होती. तरुण हिंदी बोलत होता, तर मुलगी मराठी. ननवरे यांना तरुणाचे आणि मुलीचे वय पाहून संशय आला. त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने कधी वडील, तर कधी भाऊ असल्याचे सांगितले.

दरम्यान, ननवरे यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, ती मुलगी त्याची कोणी नातेवाईक नसून ती घरच्यांना न सांगता पुण्याकडे निघाल्याचे सांगितले. ती मुळची वसई येथील असल्याचे देखील तिने सांगितले. आरोपी तरुण वेळोवेळी मुलीला डोळ्याने खुणावून माहिती नको देऊ, असे सांगत होता. ननवरे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलीकडून तिच्या मामाचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यांनी तिच्या मामाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलीचा फोटो पाठवून खात्री केली. त्यांनी मुलीला ओळखले.

ननावरे यांनी तोपर्यंत याबाबत पुणे पोलिस नियंत्रण कक्ष आणि लोहमार्ग पोलिसांकडून मदत मागितली. रेल्वे शिवाजीनगर स्थानकात आल्यानंतर आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर मुलगी मामाकडे दिली. मुलीला वाटले होते, आरोपी तरुण आपल्याला पुण्यात मामाकडे घेऊन निघाला आहे. दयानंदकुमार शर्मा (रा. वसई, मूळ बिहार) असे मुलीचे अपहरण केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला ननवरे यांनी पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT