पुणे

शैक्षणिक ‘दर्जा’साठी बनवाबनवी!

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा  : देशात शिक्षणाचा दर्जा आणि भौतिक सुविधांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अर्थात पीजीआय मानांकन देण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. परंतु, महाराष्ट्रात माहितीची बनवाबनवी करून शैक्षणिक दर्जा आणि भौतिक सुविधा चांगल्या असल्याचे दाखविण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. त्यामुळे केवळ कागदावर दर्जा सुधारून नेमके काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यू-डायस पोर्टलवरील माहितीच्या आधारेच पीजीआय मानांकन दिले जाते.  परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या अहवालात शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यात येते.
या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्चित करण्यात येत आहे. ही श्रेणी सुधारावी, यासाठी शाळांमध्ये नसलेल्या सुविधादेखील शाळांमध्ये आहेत, असे दाखवावे यासाठी मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागातील अधिकारीच दबाव टाकत असल्याचे त्यांनी मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रावरून उघडकीस आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी एक पत्रक काढले आहे. या पत्राव्दारे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांनी युडायसमध्ये भरलेल्या 12 सुविधांच्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. यामध्ये काही नसलेल्या सुविधा आहेत म्हणून दाखविण्यास सांगितले असल्याचे उघडकीस आले आहे.
काय आहे खोटेपणा?
किचन गार्डन या सुविधेसंदर्भात शालेय पोषण आहार सर्व शाळांमध्ये शिजवला जातो. त्यासाठी लागणारे किचन गार्डन असणे आवश्यक आहे. किचन गार्डन 'होय' म्हणून भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात आज अनेक शाळांमध्ये व्हरांड्यातच खिचडी शिजवण्यात येत असल्याचे दिसून येते.
मेडिकल चेकअप या सुविधेसंदर्भात जिल्ह्यातील 1 हजार 52 शाळांची तपासणी झाली नाही, असे भरलेले आहे. त्यावर सर्व शासकीय शाळांची तपासणी झालेली आहे. त्यामुळे मेडिकल चेकअप 'होय' म्हणून भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये वैद्यकीय तपासणीच झाली नससल्याचे उघडकीस आले आहे.  कार्यानुभवासाठी खोली या सुविधेसंदर्भात शाळांमध्ये कला, कार्यानुभवासाठी खोली नाही, असे भरलेले आहे. त्यावर भाषा, गणित पेटी दिलेली आहे. म्हणून 'होय' भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात कार्यानुभवसाठी खोली आणि भाषा, गणित पेटी याचा काडीचाही संबंध नाही.
सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन या सुविधेसंदर्भात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन नाही, असे लिहिले आहे. त्यावर बहुतेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन मिळालेले असून, 'होय' म्हणून दुरुस्ती करावी, असे सांगितले आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागात असंख्य शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन नसल्याचे दिसून येते.
पिण्याचे पाणी या सुविधेसंदर्भात पाणी नाही म्हणून लिहिले आहे. त्यावर पिण्याचे पाणी नसलेल्या शाळा पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त दिसतात. पिण्याचे पाण्याचे जार व इतर माध्यमांव्दारे पाण्याची सोय उपलब्ध असल्याने सर्व शाळांनी 'होय' म्हणून भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, आजही अनेक शाळांमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची सोयदेखील उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते.
अंगणवाडी या सुविधेबाबत कॅम्पसमध्ये अंगणवाडी नाही, असे लिहिले आहे. अंगणवाडी  कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसच्या बाजूलाच असते. त्यामुळे 'होय' म्हणून भरावे, असे सांगितले आहे. प्रत्यक्षात अनेक शाळांच्या कॅम्पसमध्ये अंगणवाडी नसल्याचे दिसून येत आहे.
शाळांकडे ज्या सुविधा आहेत, त्यांचीच वस्तुस्थितीदर्शक माहिती भरणे गरजेचे आहे. ज्या सुविधा नाहीत, त्या 'नाही' म्हणून भराव्यात. जिल्हा परिषदांनी एमपीएसपीकडून निधी उपलब्ध करून संबंधित सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. चुकीची माहिती भरून वरचा क्रमांक मिळविण्यात काहीही अर्थ नाही. 
                                                        – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय  
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT