The Noir Pub Raid Pudhari
पुणे

The Noir Pub Raid: ‘द नॉयर’ पबवर एक्साइजचा छापा; मद्यधुंद तरुण-तरुणींसह ५२ जण ताब्यात

विनापरवाना पार्टीचा पर्दाफाश; पबमालकासह दहा जणांवर गुन्हा, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे : विमानतळ परिसरातील नॉयर पबवर (रेड जंगल) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 27) पहाटे छापा टाकला. पबमध्ये विनापरवाना पार्टी सुरू होती. या वेळी मद्यधुंद तरुण-तरुणींसह तब्बल ५२ जण या पार्टीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले, तर १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या, साउंड सिस्टिम, लाकडी पॉट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. अधीक्षक अतुल कानडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

दरम्यान, शहरात 'थर्टी फर्स्ट'च्या आधीच पार्ट्यांचा धडाका सुरू झाला असून, अनेक ठिकाणी विनापरवाना मद्यपान व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याचे चित्र आहे. पबचालक अमरजित सिंग संधू (वय ३०) याने परवाना नसताना मद्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी त्याच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एअरपोर्ट रोडवरील 'द नॉयर' हा पब कोणताही वैध परवाना नसताना मद्यविक्री व मद्यपानासाठी खुला ठेवण्यात आला होता. पहाटे पाचपर्यंत जोरात संगीत, मद्यपान आणि धांगडधिंगा सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर थेट उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी अचानक संबंधित पबवर छापा टाकला. छाप्यादरम्यान पबमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी मद्यप्राशन करताना आढळून आले. अवैध मद्यव्यवसायासाठी वापरण्यात आलेले साहित्य, टी-पॉय, लोखंडी स्पीकर्स, साउंड सिस्टिम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशिनसह सुमारे ३ लाख ६७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, याच ठिकाणी अवैधरीत्या हुक्का बारही चालवला जात असल्याचे उघडकीस आले. तंबाखूजन्य फ्लेवर असलेला हुक्का ग्राहकांना पुरवताना आढळून आल्याने विमानतळ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जितेंद्र पाटील, संदीप कदम, सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, विनोद शिंदे, रोहित माने यांच्यासह उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.

स्कॉचची तस्करी, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

हरियाणातून महाराष्ट्रात होणाऱ्या उच्च प्रतीच्या स्कॉचची तस्करी उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत खेड तालुक्यातील वाकी बु. गावच्या हद्दीत हरियाणातील टेम्पो व चारचाकी वाहनांमधून तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, हरियाणातील पाच जणांना अटक करण्यात आली.

हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता. येथे आलेल्या तब्बल 52 जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पबमालकासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, मद्यसाठ्यासह इतर साहित्य जप्त केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदा पार्ट्यांवर उत्‍पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, अशा पार्ट्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पुणे

फोटोः आजच्या तारखेला एक्साईज नावाने सेव्ह

ओळी : उत्पादन शुल्क विभागाने द नॉयर पबवर छाटा टाकला. या वेळी अधीक्षक अतुल कानडे आणि

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT