कात्रज: कात्रज परिसरातील जांभूळवाडी तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे काम महापालिकेने जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला दिले आहे. मात्र, मे महिन्याचा पहिला आठवडा उलटला, तरी या तलावातील गाळ काढण्याबाबत पाटबंधारे विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. तसेच पाणीही सोडण्यात आले नसल्याने यंदा तलावातील गाळ काढणे अवघड झाले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाषाण तलाव, कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावासह जांभूळवाडी तलावातील गाळ काढण्याचे काम महापालिकेने जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला दिले आहे. (Latest Pune News)
यासाठी चार कोटींपैकी एक कोटी रुपयांची रक्कम ही जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आली. जांभूळवाडी तलावाची महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी संयुक्त पाहणी करत हे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी तलावावर मशिनही आणण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही हे काम सुरू झाले नाही.
या तलावात सध्या मोठा पाणीसाठा आहे. गाळ काढण्यासाठी हे पाणी सोडावे लागणार आहे. मात्र महापालिकेच्या वतीने तलावाखालील रस्त्याचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यासाठी आणखी एक आठवडा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पाणी सोडण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने मे महिन्याचा शेवटचा आठवडा येईल. त्यामुळे आगामी पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
जांभूळवाडी तलावात येणारे मैलायुक्त पाणी, गाळ आणि राडारोडा निघून तलाव स्वच्छ होईल, या आशेने परिसरातील नागरिक सुखावले होते. मात्र गाळ काढण्याच्या कामाला उशीर होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
जांभूळवाडी तलावातील गाळ काढण्याचा महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र प्रशासनाने अद्याप पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली नसेल, तर हे काम पूर्ण कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. मे महिन्याच्या अखेरीस ठेकेदारधार्जिन काम करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आम्ही होऊ देणार नाही. या तलावाचे क्षेत्र मोठे असून, गाळ काढण्याचे काम किमान पावसाळ्यापूर्वी एक महिना अगोदर सुरू होणे अपेक्षित होते.- युवराज बेलदरे, माजी नगरसेवक
जांभूळवाडी तलावाची मालकी पाटबंधारे विभागाकडे आहे. महापालिका या तलावातील गाळ काढण्याचे काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यासाठी आमच्याकडे अद्यापही परवानगी मागितली नाही. याबाबत मागणी झाल्यास महापालिकेला सहकार्य केले जाईल.-श्वेता कुराडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग