

पुणे: फिरस्ती व्यक्तीच्या खुनाचा छडा लावत समर्थ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पूर्वीच्या वादातून त्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून मित्राचा खून केला होता. किशोर कांबळे (वय 25, रा. सातारा, सध्या रा. मालधक्का चौक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर पोलिसांनी भीम गायकवाड (वय 40, रा. मालधक्का चौक) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिस हवालदार इम्रान राज मोहम्मद खान (वय 46) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मालधक्का चौकातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सांस्कृतिक भवनच्या बाजूने नरपतगिरी चौकाकडे येणार्या फुटपाथवर 5 मेच्या मध्यरात्री घडला होता. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील फुटपाथवर एक जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती देण्यात आली. (Latest Pune news)
समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी गेले. तेथे किशोर कांबळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
फुटपाथवरील आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यावर किशोर कांबळे याचे नाव निष्पन्न झाले. गेली दोन वर्षे तो तेथेच फुटपाथवर राहत होता. मिळेल तेथे केटरिंगचे काम करीत होता. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून भीम गायकवाड याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला.
भीम गायकवाड आणि किशोर कांबळे हे दोघे गेली दोन वर्षे फुटपाथवर शेजारी शेजारी राहत होते. दोघेही केटरिंगचे काम मिळेल तेथे करीत होते. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून मध्यरात्री भीमने किशोरच्या डोक्यात तेथे पडलेला पेव्हर ब्लॉक घातला व त्याचा खून केला. त्यानंतर तो पळून गेला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करीत आहेत.