पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. मात्र, काही आर्थिक सक्षम असणार्या महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे राज्यासह पुणे जिल्ह्यातील इन्कम टॅक्स भरणार्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू झाला आहे. या तपासणीत टॅक्स भरणार्या महिला आढळून आल्या, तर त्यांची नावे आपोआप कमी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Pune News Update)
काही दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी असलेल्या दोन हजार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. त्यांची नावे आता वगळण्यात आली आहे. आता राज्यासह पुणे जिल्ह्यातील इन्कम टॅक्स भरणार्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू झाला आहे. सदरील तपासणीत टॅक्स भरणार्या महिला आढळून आल्या तर त्यांची नावे आपोआप कमी केली जाणार आहेत. राज्य शासनाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची नावे आहेत.
सदरील लाभार्थ्यांच्या याद्या व इन्कम टॅक्स भरणार्या महिलांची नावे तपासली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली. त्यावेळी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै होती; परंतु, अर्ज अधिक येत असल्याने व कोणीही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देत 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून सप्टेंबर अखेरपर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आर्थिकरीत्या सक्षम असणार्या महिलांची नावे वगळण्यास सुरुवात केली. मार्च 2025 महिन्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थी यांची नावे वगळण्यात आली.
केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास सचिवांना आयकर भरणार्या महिलांचा डेटा देण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अधिसूचना 3 जून 2025 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव जया प्रकाश यांच्या मान्यतेने काढण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आणि आयकर भरणार्या महिलांना वगळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या अर्थ खात्याकडे परवानगी मागितली होती. यास केंद्राने मंजुरी दिली आहे.
आंबेगाव- 62232 भोर- 50,995
दौंड- 98167 हवेली- 40,9709
इंदापूर- 10,6354 जुन्नर- 101036 खेड- 115162 मावळ- 93742
मुळशी- 45963 पुरंदर- 65082
शिरूर- 100343 वेल्हा- 14241 पुणे शहर- 674045
एकूण- 2055133