पुणे: पुणे शहरात मागील वर्षासारखी पूरस्थिती होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाने स्थापन केलेल्या पूरनियंत्रण कक्षासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांनी अजूनही मनुष्यबळ पुरविले नाही. याबाबत जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दोनवेळा स्मरणपत्र देऊनही कर्मचारीवर्ग देण्यात आला नाही. यावरून या प्रकरणाची संवेदनशीलता महापालिकेकडे नाही, अशी चर्चा जलसंपदा विभागात सुरू आहे.
पुणे शहरासह खडकवासला धरण परिसरात गेल्या वर्षी मोठा पाऊस झाला. धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. हे पाणी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीत शिरल्यानंतर पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. (Latest Pune News)
त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली होती. पूर्वसूचना न देता धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्याची टीका जलसंपदा विभागावर करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर धरण पूर्ण भरण्यापूर्वी आणि धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जलसंपदा विभागाने आता यासाठी पूरनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यामुळे दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीएला पूरस्थितीची माहिती देण्यात येणार आहे. हा नियंत्रण कक्ष खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम करणार आहे. या नियंत्रण कक्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेच्या काही कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे ठरले आहे.
तसेच, जलसंपदा विभागाचे 3 कर्मचारी 24 तास या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. जलसंपदा विभागाने 22 मे रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्मचारी पुरविण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर 5 जून रोजी दुसरे स्मरणपत्रही देण्यात आले, तरीही कर्मचारी देण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.
कर्मचारी देण्याबाबत दोन्ही महापालिकांना पत्र दिले आहे. मात्र, अद्याप कर्मचारी दिलेला नाही.
- श्वेता कुर्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प